क्रिकेट हा आज जगभरातील एक प्रमुख खेळ म्हणून पाहिला जातो. मैदानावर प्रत्येक बॉलवर जल्लोष करणारे चाहते, आता खेळाडूंच्या ऑफ-द-फिल्ड आयुष्याविषयीही तितकेच जाणून घेण्यास उत्सुक आहेत. विशेषतः कसोटी क्रिकेटसारख्या दीर्घ आणि क्लासिक स्वरूपाच्या खेळात, जेव्हा ‘लंच ब्रेक’ आणि ‘टी ब्रेक’ यासारखे शब्द ऐकायला मिळतात, तेव्हा अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो हे खेळाडू नेमकं खातात काय? आणि हो, “ते खरंच चहा पितात का?”

असाच एक प्रश्न इंग्लंडचा स्टार फलंदाज ऑली पोपला विचारण्यात आला. सध्या भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत चमकदार प्रदर्शन करणाऱ्या या 27 वर्षीय खेळाडूने मीडियाशी गप्पा मारताना त्याच्या ‘ब्रेक मेन्यू’ची माहिती दिली.
ऑली पोपने केला खुलासा
पोपने सांगितलं की, कसोटी सामन्यादरम्यान लंचच्या वेळेस तो चिकन, मासे किंवा पास्ता यांसारखे प्रथिने आणि ऊर्जा देणारे पदार्थ खाणं पसंत करतो. मात्र, जर त्याची फलंदाजी सुरू असली, तर तो फारसं खात नाही – फक्त एक प्रोटीन शेक किंवा एखादी केळी पुरेसी असते. यामागील कारण स्पष्ट करताना तो म्हणतो, “फलंदाजीत असताना फार खाल्लं की अंग जडं होतं. त्यामुळे हलकं काहीतरी घेतो, जे मला ऊर्जा देतं आणि खेळण्यास सोपं वाटतं.”
मात्र जेव्हा त्याची फलंदाजी संपते, तेव्हा तो पुन्हा भरपेट जेवण करत नाही. दिवसभर खेळून आलेला थकवा आणि शरीराची गरज लक्षात घेऊन तो फक्त आवश्यक तेवढंच खातो. त्याला जेवणापेक्षा “रिलॅक्स” होणं आणि फोकस परत मिळवणं महत्त्वाचं वाटतं.
‘टी ब्रेक’मध्ये खेळाडू खरंच चहा घेतात?
आता प्रश्न येतो ‘टी ब्रेक’चा म्हणजे खेळाडू खरंच चहा पितात का? या प्रश्नावर हसत उत्तर देताना पोप म्हणतो, “हो, काही खेळाडू चहा घेतात. पण मी वैयक्तिकरित्या कॉफी पसंत करतो. विशेषतः जेव्हा सामना उशिरा सुरू होतो किंवा पावसामुळे थांबतो, तेव्हा मात्र मी एक कप चहा घेतो.” यावरून हे स्पष्ट होतं की टी ब्रेक फक्त चहापुरता मर्यादित नसतो खेळाडू त्यावेळी काय प्यायचं, हे त्यांच्या सवयी आणि गरजेनुसार ठरतं.
ऑली पोपच्या या सविस्तर उत्तरामुळे एक गोष्ट ठळकपणे समोर येते, की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणतंही जेवण हे तसंच ठरवलेलं नसतं. प्रत्येक खेळाडूच्या शरीराची आणि खेळाची गरज वेगळी असते, त्यामुळे त्यानुसार अन्न आणि पेय निवडली जातात. यासाठी संघासोबत आहारतज्ज्ञ, प्रशिक्षक आणि डॉक्टरांची एक संपूर्ण टीम असते, जी खेळाडूंच्या पोषणावर बारकाईने लक्ष ठेवते. कारण, खेळाच्या मैदानावर जी चपळाई, सहनशक्ती आणि एकाग्रता आपण पाहतो, त्यामागे अशी काटेकोर आणि शिस्तबद्ध आहारशैली असते.