रस्त्यावर दिसणारे पांढऱ्या-हिरव्या-पिवळ्या रंगाचे मैलाचे दगड नेमकं काय सांगतात?, जाणून घ्या याचा अर्थ!

Published on -

रस्त्यावरून लांबचा प्रवास करताना तुम्हीही कधी न कधी त्या रंगीत मैलाच्या दगडांकडे पाहिलं असेल, पण त्या रंगांचा अर्थ काय असतो हे खरंच माहित आहे का? पिवळा, हिरवा, नारिंगी, पांढरा… या दगडांमागे नुसता रंग नाही, तर एक संपूर्ण रचना आहे जी भारताच्या रस्त्यांवर चालणाऱ्या लाखो वाहनचालकांना दिशा दाखवत असते.

पिवळा रंग

मुळात हे दगड केवळ अंतर कळवण्यासाठी नाहीत, तर प्रवासादरम्यान आपण कुठल्या प्रकारच्या रस्त्यावर आहोत हे सांगण्यासाठीही लावले जातात. त्यांचा रंग हीच त्यांची ओळख असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही गाडी चालवत असताना रस्त्याच्या कडेला पिवळ्या रंगाचा दगड पाहिला, तर समजून घ्या की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर आहात. म्हणजेच असा रस्ता जो दोन किंवा अधिक राज्यांतील महत्त्वाची शहरे जोडतो. दिल्ली-मुंबई किंवा चेन्नई-कोलकाता यांसारख्या मोठ्या मार्गांवर अशा दगडांची ओळख अगदी सहज होते.

हिरवा रंग

दुसरीकडे, हिरव्या रंगाचा दगड दिसला तर तो राज्य महामार्गाचे चिन्ह समजा. हे रस्ते एका राज्याच्या मर्यादेतच असतात आणि दोन शहरं किंवा जिल्ह्यांना जोडण्याचं काम करतात. पुणे-नाशिक किंवा लखनऊ-कानपूर यांसारख्या मार्गांवर हे हिरवे मैलाचे दगड दिसतात. तेही तिथल्या अंतराची, रस्त्याच्या दिशेची आणि पुढच्या शहराची माहिती बरोबर देतात.

पांढरा, काळा किंवा निळा रंग

कधी कधी तुम्हाला पांढरा, निळा किंवा काळा रंग असलेले दगडही दिसतील. हे मुख्यतः जिल्हा किंवा शहराच्या रस्त्यांवर लावले जातात. यावर लिहिलेली माहिती तुलनेने छोटी असते, कारण अंतरही कमी असतं. पण ती माहिती स्थानिकांना आणि नवख्या वाहनचालकांनाही मोठा आधार ठरते.

नारिंगी रंग

तुम्ही जर खेडेगावात जात असाल, तर नारिंगी रंगाचे दगड तुमचं लक्ष वेधून घेतात. ते ग्रामीण रस्त्यांचे चिन्ह असतात, जे गावांना शहरांशी किंवा महामार्गांशी जोडण्याचं काम करतात. या रस्त्यांचं स्वरूप अनेकदा कच्चं असतं, पण तेवढंच महत्त्वाचंही.

या सगळ्या रंगीत संकेतांची रचना काही अचानक उगम पावलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारांनी मिळून एकसंध अशी प्रणाली तयार केली आहे, जी आज संपूर्ण भारतभर लागू आहे. या रंगांनी वाहनचालकांना रस्त्यांची श्रेणी सहज समजते, त्याचबरोबर रस्ता सुरळीत आणि सुरक्षित बनतो.

रात्री प्रवास करताना, या दगडांवर लावलेले परावर्तक रंग किंवा स्टिकर्स हेडलाईटच्या प्रकाशात चमकतात. त्यामुळे अंधारातही हे संकेत विसरता येत नाहीत. काही ठिकाणी तर एलईडी लाइट्ससह माईलस्टोन लावले गेले आहेत, जे अधिक आधुनिक आणि सुरक्षित आहेत.

आज जीपीएस आणि मोबाईल अ‍ॅप्सच्या युगात आपण पोहोचलेलो असलो, तरी मैलाचे हे दगड अजूनही प्रवासाचा एक विसरू न येणारा भाग आहेत. भविष्याकडे पाहिलं तर कदाचित हे दगड QR कोड किंवा डिजिटल स्क्रीनसहही दिसू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!