जर विमानाचं इंधन संपलं तर काय होईल ? पायलट काय निर्णय घेतो ?

Published on -

आकाशात एखादं विमान शांतपणे झेपावतं, तेव्हा अनेकांना वाटतं या लोखंडी पक्षाला हवेत एवढं स्थिर कसं ठेवता येतं ? आणि जर कधी अचानक इंधनच संपलं, तर मग काय? विमान तसंच कोसळून जातं का? हा विचार काहीसा भीतीदायक असला तरी, त्यामागचं वास्तव जाणून घेणे महत्वाचे आहे कारण आकाशात उडणाऱ्या प्रत्येक विमानात अशा आपत्कालीन प्रसंगांचा विचार आधीच केलेला असतो.

इंधन संपण्याची शक्यता अगदीच दुर्मीळ असली, तरीही काही वेळा अनपेक्षित तांत्रिक अडचणींमुळे हे घडू शकतं. पण अशावेळी विमान आकाशातून थेट खाली पडतं, असं नाही. खरं तर विमानाचं इंजिन बंद पडलं, तरी ते हवेतच ग्लाइड करू शकतं म्हणजेच इंधनाशिवाय हवेत तरंगत पुढे जाणं शक्य असतं.

यासाठी प्रत्येक विमानाला ‘ग्लाइड रेशो’ असतो उंचीच्या तुलनेत ते किती लांब जाऊ शकतं, याचा अंदाज त्यावरून घेतला जातो. उदाहरणार्थ, जर एखादं विमान १० किमी उंचीवर असेल आणि त्याचा ग्लाइड रेशो १५:१ असेल, तर ते जवळपास १५० किमी पर्यंत इंधनाशिवायही हवेत राहू शकतं.

या काळात, पायलटला जवळचं विमानतळ शोधून, शांतपणे आपत्कालीन लँडिंगचं नियोजन करता येतं. पायलट अशा प्रसंगांसाठी पूर्णपणे प्रशिक्षित असतो. ‘मेडे’ म्हणजेच आपत्कालीन सिग्नल देताच एअर ट्रॅफिक कंट्रोल सतर्क होतं, जवळच्या विमानतळांवर तयारी सुरू होते.

 

तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर विमानामध्ये ‘राम एअर टर्बाइन’ (RAT) नावाचं उपकरण असतं, जे वाऱ्याच्या दाबावर चालतं आणि आवश्यक नेव्हिगेशन व नियंत्रणासाठी पुरेशी वीज पुरवतं. म्हणजेच इंजिन बंद असतानाही, पायलटकडे विमान चालवण्याची शक्ती आणि संधी दोन्ही असते.

विमान कंपन्या आणि वैमानिक दोघेही अशा परिस्थितींसाठी सज्ज असतात. प्रशिक्षण सिम्युलेटरमध्ये पायलटांना इंधन संपल्यावर काय करावं, याचं तंतोतंत मार्गदर्शन दिलं जातं. प्रत्येक उड्डाणासाठी राखीव इंधन असतंच, पण तरीही कोणतंही संकट आल्यास त्याला तोंड देण्याची तयारी ठेवली जाते.

 

१९८३ मध्ये कॅनडामधील ‘गिमली ग्लायडर’ ही घटना म्हणजे याचं जिवंत उदाहरण. एक विमान चुकीच्या इंधन गणनेमुळे आकाशातच थांबण्याच्या उंबरठ्यावर आलं होतं. पण पायलटने संयम आणि कौशल्याने धावपट्टीवर सुरक्षित उतरवलं.

२००१ साली, एअर ट्रान्सॅट फ्लाइट २३६ अटलांटिक महासागरावरून उडत असताना इंधन गळती झाली. पण सुमारे वीस मिनिटं ग्लाइड करून, विमान पोर्तुगालमधील एका लष्करी विमानतळावर सुखरूप उतरलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!