चातुर्मास म्हणजे काय? या काळात काय करावे आणि काय नाही?, जाणून घ्या धार्मिक महत्व आणि नियम!

Published on -

चातुर्मास… सनातन परंपरेतील एक असा काळ जेव्हा निसर्ग, धर्म, अध्यात्म आणि मनुष्याचे अंतरंग या साऱ्यांचा एक विलक्षण संगम घडतो. आषाढ शुक्ल एकादशीपासून सुरू होणारा आणि कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चालणारा हा चार महिन्यांचा काळ फक्त सण-उत्सवांनी भरलेला नसतो, तर तो मनाला शुद्ध करणाऱ्या साधनेसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

चातुर्मास म्हणजे?

यंदा चातुर्मास 6 जुलै 2025 पासून सुरू झाला असून त्याची सांगता 2 नोव्हेंबर 2025 रोजी तुळशी विवाहाने होईल. या काळात हिंदू धर्मातील बहुतेक शुभकार्य थांबतात. लग्न, गृहप्रवेश, मुंडन यांसारख्या विधींना स्थगिती मिळते. कारण याच काळात, पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि क्षीरसागरात विश्रांती घेतात. या अवस्थेत विश्वाच्या संचालनाची जबाबदारी भगवान शंकरावर येते आणि म्हणूनच चातुर्मास हा काळ शिवभक्ती आणि तपश्चर्येसाठी विशेष मानला जातो.

एका पौराणिक कथेनुसार, राजा बलीने केलेल्या महान यज्ञामुळे त्याला पाताळलोकावर राज्य करण्याचा आशीर्वाद मिळाला आणि त्या बदल्यात भगवान विष्णू त्याच्या सोबत राहू लागले. हीच गोष्ट ‘योगनिद्रा’च्या रूपात सांगितली जाते. या काळात विष्णूची झोप म्हणजे त्यांच्या सृष्टीतील हस्तक्षेपाचा विश्रांतीचा काळ, जेव्हा सगळं काही थांबतं… स्थिर होतं… आणि आपणही त्या स्थिरतेच्या अनुभवासाठी आपले बाह्य आणि आंतरिक प्रवाह थांबवायला शिकतो.

काय करावे, काय नाही?

चातुर्मासाचा गाभा म्हणजे संयम, साधना आणि आत्म-अवलोकन. या काळात मांसाहार, मद्यपान, तामसी आहार यांचं त्याग करणं, सात्विक जीवनशैली अंगीकारणं आणि व्रत, उपासना, ध्यान यांत मन केंद्रित करणं हीच खरी तयारी असते आत्मिक उन्नतीसाठी. श्रीमद्भागवत, रामायण, भगवद्गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांचं वाचन, भजन-कीर्तन, कथा श्रवण, संध्यावंदन यांसारख्या दिनचर्यांचा अभ्यास करून मनात नवा प्रकाश जागवायचा असतो.

दान-धर्म करावे

तसेच, या काळात तीर्थयात्रा, दानधर्म, गरीबांना अन्न-वस्त्र देणं या गोष्टींचंही विशेष महत्त्व आहे. कारण धर्मशास्त्र सांगतात की चातुर्मासातील केलेले पुण्यकर्म अनेकपटींनी वाढून फळ देतात. विशेषतः श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक हे चारही महिने प्रत्येक आठवड्याला एखाद्या नव्या व्रत, संकल्प, पूजा किंवा सणाच्या निमित्ताने आध्यात्मिक उंचीची संधी देतात.

या काळात शरिरालाही विश्रांती दिली जाते. पुरातन काळी पावसाळ्यामुळे प्रवासाला अडथळे येत असत, त्यामुळे साधू-संत एका जागी थांबून तपश्चर्येत रमायचे. आजच्या धकाधकीच्या जीवनातसुद्धा, चातुर्मास म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या त्रिसूत्रीला संतुलित ठेवण्यासाठी दिलेला एक संधीचा काळ आहे.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!