लढाऊ विमाने, बॉम्बर्स, इतर लढाऊ विमाने आणि वैमानिकांना कठोर प्रशिक्षण देऊनच एखाद्या देशाचे हवाई दल अधिक शक्तिशाली बनते. ही शक्ती टिकवण्यासाठी जगभरातील सरकारे अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. कारण युद्धजन्य परिस्थितीत सर्वात आधी शत्रूवर आघात करण्याची जबाबदारी हवाई दलावरच असते. त्यामुळेच जगातील विविध देश आपले हवाई दल अद्ययावत ठेवण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत.

USA
जगात सध्या सर्वात मोठं आणि शक्तिशाली हवाई दल म्हणजे अमेरिकेचं “यूएस एअर फोर्स”. यांच्याकडे 5,000 पेक्षा जास्त विमाने आहेत. यात हजारो लढाऊ विमाने आहेत, ज्यात F-15, F-16, F-18 यांसारखी चौथ्या पिढीतील विमाने आणि अत्याधुनिक F-22 रॅप्टर, F-35 लाइटनिंग II यांसारखी पाचव्या पिढीतील स्टेल्थ विमानेही आहेत. या विमानांचा वेग, तंत्रज्ञान आणि गुप्ततेची क्षमता जगात सर्वोच्च मानली जाते.
रशिया
संख्येच्या बाबतीत रशिया देखील मागे नाही. रशियाच्या हवाई दलाकडेही हजारो विमाने आहेत. त्यांचे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान Su-57 ‘फेलॉन’ हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत मानले जाते. रशियाचे हवाई दलही युद्धकालात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
चीन
रशियानंतर तिसऱ्या क्रमांकावर चीनचे हवाई दल आहे. चीनकडे J-10, J-11, J-16 यांसारखी चौथ्या पिढीतील विमाने आहेत, तसेच त्यांचं पाचव्या पिढीतील J-20 ‘मायटी ड्रॅगन’ हे स्टेल्थ विमान जगभरात चर्चेत आहे.
भारत चौथ्या क्रमांकावर
भारतीय हवाई दल हा जगातील चौथा सर्वात मोठा हवाई दल आहे. भारताकडे Su-30MKI, Rafale, MiG-29, Mirage 2000, आणि स्वदेशी तेजस यांसारखी विमाने आहेत. याशिवाय भारत आपल्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांवरही काम करत आहे. स्वदेशी क्षमतांवर भर देत भारतीय हवाई दल अधिक मजबूत होत आहे.
या यादीत दक्षिण कोरिया, जपान, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की यांचाही समावेश आहे. हे देशही आपापल्या क्षमतेप्रमाणे आधुनिक विमाने विकत घेऊन अथवा विकसित करून हवाई क्षेत्रात आपली पकड मजबूत करत आहेत.