केसांची निगा राखणं ही केवळ सौंदर्यसंपन्न दिसण्यासाठी नव्हे, तर आत्मविश्वासासाठीही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपले केस मजबूत, निरोगी आणि चमकदार राहावेत, असं प्रत्येकालाच वाटतं. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात कायमच राहतो, खरंच केसांना तेल लावावं का? काही जण म्हणतात की तेल लावल्यामुळे केस बळकट होतात, तर काहींचं मत असतं की त्यामुळे केस अजूनच गळू लागतात. मग खरं काय? आणि सर्वात महत्त्वाचं योग्य पद्धत नेमकी कोणती?

केसांबाबत आपल्याकडे अनेक परंपरागत समज-गैरसमज आहेत. आपली आजी, आई सांगत आली आहे की, ‘केसांना तेल लावल्याशिवाय त्यांचं पोषण होत नाही’, तर आजकाल अनेकजण म्हणतात की तेल लावल्यानं केस चिकट, तोकडे आणि गळतीस कारणीभूत होतात. ही मतभिन्नता एखाद्या चर्चेच्या कार्यक्रमासारखी वाटावी, इतकी ती ताणलेली आहे. पण जेव्हा आपण थोडं खोलवर पाहतो, तेव्हा उत्तर सापडतं. शरीराला जसं अन्नाचं पोषण लागतं, तसंच केसांनाही पोषण लागते, आणि त्यासाठी तेल ही एक सोपी आणि नैसर्गिक पद्धत आहे.
तेल लावण्याचे फायदे
केस कोरडे होणे, मुळांपासून कमजोर होणे, किंवा कोंड्याची समस्या निर्माण होणं याच्या मुळाशी पोषणाचा अभाव असतो. अशावेळी योग्य प्रकारे आणि वेळेवर लावलेलं तेल केसांना पुन्हा ताकद देऊ शकतं. विशेषतः ज्यांना सतत कोरडेपणा, कोंडा किंवा केस गळती यांचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. तेल लावल्यानंतर टाळूला हळुवार मसाज दिल्यास रक्ताभिसरण वाढतं आणि ते केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यात मदत करतं.
तेल कितीवेळा लावावे?
पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तेल लावण्याची पद्धत चुकीची असेल, तर त्याचे परिणाम नकारात्मकही होऊ शकतात. अनेकजण तेल लावून रात्रभर ते तसंच ठेवतात, पण तज्ज्ञ सांगतात की असं करणं टाळावं. त्याऐवजी थोडंसं कोमट तेल वापरून टाळूवर बोटांनी हलक्या हाताने मसाज करावी, आणि सुमारे 1 ते 2 तासांनी शॅम्पू करून केस स्वच्छ धुवावेत. यामुळे तेल त्वचेत मुरतं, पण मोकळ्या केसांवर थर साचत नाही.
आठवड्यातून एकदा असा तेल मसाज पुरेसा असतो. केसांना दिवसा तेल लावणं जास्त फायदेशीर मानलं जातं, कारण रात्री झोपताना तेलाचे अंश उशाला लागतात, ज्यामुळे टाळूवर बॅक्टेरियांची वाढ होऊ शकते. योग्य काळजी घेतल्यास तेल हे फक्त जुना सवयीचा भाग न राहता, केसांसाठी एक परिणामकारक उपाय ठरू शकतो.