श्रावण महिना सुरू झाला की निसर्गात एक वेगळीच चैतन्यता भरते. सगळीकडे हिरवळ पसरते, आकाशात ढग खेळू लागतात आणि हवेच्या झुळूकीत गारवा जाणवतो. याच हिरव्यागार वातावरणात, स्त्रियांच्या मनात आनंद फुलवणारा सण म्हणजे हरियाली तीज. हा सण केवळ पावसाळ्याच्या आगमनाचाच उत्सव नसतो, तर तो प्रेम, समर्पण आणि सौभाग्याचं सुंदर प्रतीक मानला जातो.

कधी आहे हरियाली तीज?
यंदा हरियाली तीज 27 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. खास करून उत्तर भारतात राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये या सणाला मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. काही ठिकाणी याला श्रावण तीज, छोटी तीज किंवा मधुश्रवणी तीज असंही म्हणतात. परंपरेप्रमाणे या दिवशी स्त्रिया देवी पार्वतीची पूजा करतात आणि आपापल्या पतीच्या आयुष्याच्या, आरोग्याच्या आणि सुखाच्या कामनेसाठी निर्जल व्रत करतात.
हरियाली तीजची कथा
हरियाली तीजमागे एक अतिशय भावनिक पौराणिक कथा आहे. देवी पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून मिळवण्यासाठी 108 जन्मांत कठोर तपश्चर्या केली, अशी श्रद्धा आहे. अखेर तिच्या या अचल श्रद्धेने आणि समर्पणाने भगवान शिव प्रसन्न झाले आणि श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला त्यांनी पार्वतीशी विवाह करण्याची संमती दिली. म्हणूनच हा दिवस शिव-पार्वतीच्या मिलनाचा प्रतीक म्हणून मानला जातो आणि स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र ठरतो.
या दिवशी विवाहित स्त्रिया सोळा श्रृंगार करतात, म्हणजेच पारंपरिक साजशृंगार करून पार्वतीसारखे रूप सजवतात. सकाळी सूर्योदयाच्या आधी ‘सरगी’ म्हणजेच उपवासाआधी हलका आहार घेतला जातो, आणि त्यानंतर संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता निर्जल व्रत पाळलं जातं. काही स्त्रिया रात्री भगवान शिव आणि पार्वतीची कथा ऐकतात, भजनं गातात आणि झुल्यावर बसून श्रावणचा आनंद लुटतात.
अविवाहित मुलीही या दिवशी व्रत करतात. त्यांच्या इच्छित पतीची प्राप्ती व्हावी, असा संकल्प करून. अशा प्रकारे हरियाली तीज केवळ धार्मिक विधी नाही, तर स्त्रियांच्या भावनिक जगताशी, त्यांच्या श्रद्धेशी आणि प्रेमाशी जोडलेली परंपरा आहे.