शेती हा व्यवसाय जितका श्रमसाध्य, तितकाच अनिश्चिततांनी भरलेला असतो. कधी आभाळ भरून येतं पण पाऊस नाही, तर कधी वेळेवर पेरणी झाली तरी बाजारभावाने कंबर मोडते. अशा वेळी, सरकारकडून मिळणारी थोडीशीही मदत शेतकऱ्यांना दिलासा देते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही अशीच एक योजना आहे, जी वर्षातून तीन वेळा म्हणजेच दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा करून त्यांच्या लढ्याला थोडा आधार देते. आणि आता या योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.

ही योजना पहिल्यांदा 2019 मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीला केवळ 2 हेक्टरपर्यंत जमीनधारक शेतकऱ्यांनाच याचा लाभ होता, पण वेळोवेळी त्यात बदल होत गेले आणि आज ती देशभरातील लाखो लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी आशेचा एक मोठा किरण ठरली आहे. जरी हप्ता फक्त 2,000 रुपयांचा असतो, तरी त्यातून बी-बियाणे, खतं, पंपासाठी डिझेल किंवा कधी घरातल्या लहान-मोठ्या गरजाही पूर्ण करता येतात. विशेषतः अशा वेळी जेव्हा कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही, तेव्हा या हप्त्याचा उपयोग फार मोठा वाटतो.
ई-केवायसी करून घ्या, अन्यथा…
सध्या देशभरातील शेतकरी 20 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि सरकारकडून यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलीये. हा हप्ता वेळेवर मिळावा, यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण असणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी. सरकारने आता हे अनिवार्य केलं आहे. बरेच शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करत असले तरी अजून काहींनी ती पूर्ण न केल्यामुळे त्यांच्या हप्त्याच्या वाटचालीत अडथळा येऊ शकतो.
जमिनीची नोंदणी आणि पडताळणी
त्याचबरोबर, जमिनीची नोंदणी आणि पडताळणी याही तितक्याच गरजेच्या आहेत. अनेक वेळा चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे शेतकरी पात्र असूनही हप्त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे जर तुम्ही नवे अर्जदार असाल किंवा काही वर्षांपूर्वी माहिती भरली असेल, तर ती माहिती पुन्हा एकदा तपासून घेणं शहाणपणाचं ठरेल. आज इंटरनेटच्या काळात ही कामं सरकारी वेबसाईटवरून सहज शक्य आहेत.
लाभार्थी यादी
तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासण्यासाठीही फार काही करावं लागत नाही. सरकारने यासाठी एक पारदर्शक आणि सोपी प्रणाली दिली आहे. राज्य, तालुका आणि गाव यांची माहिती भरल्यानंतर तुमचं नाव यादीत दिसतं की नाही ते लगेच कळतं. जर नाव दिसलं, तर समजून घ्या की लवकरच तुमच्या खात्यावर 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.