जगात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द ‘OK’ नेमका आला कुठून?, जाणून घ्या याचे रंजक गुपित!

Published on -

आपण दररोज सहजपणे “ओके” म्हणतो, अगदी नकळत. एखाद्या गोष्टीला संमती द्यायची असेल, एखादं वाक्य संपवायचं असेल किंवा संवादाला सुरुवात करायची असेल की लगेच ओके हा शब्द आपोआपच तोंडून निघतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा छोटासा शब्द केवळ एक इंग्रजी संज्ञा नाही, तर त्यामागे एक गमतीशीर आणि ऐतिहासिक कथा लपलेली आहे?

‘OK’ शब्द कुठून आला?

ही गोष्ट सुरू होते 1839 साली, अमेरिकेत. त्या काळात वर्तमानपत्रांमध्ये विनोद म्हणून मुद्दाम चुकीचे स्पेलिंग लिहायचा एक हटके ट्रेंड सुरू होता. त्याच दरम्यान ‘ऑल करेक्ट’ या इंग्रजी वाक्याचा विनोदी अपभ्रंश ‘Oll Korrect’ असा लिहिला गेला. आणि त्याचा शॉर्टकट OK. एकदा हा शब्द छापून आला आणि वाचकांमध्ये पसंत पडला, की मग त्याचा वापर वाढत गेला.

हे एवढ्यावरच थांबत नाही. ‘OK’ ला राजकारणातूनही बळ मिळालं. 1840 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्या निवडणुकीत मार्टिन व्हॅन ब्यूरेन या उमेदवाराचं जन्मगाव होतं ‘किंडरहूक’. त्यामुळे त्याला ‘Old Kinderhook’ म्हणजेच ‘OK’ या टोपणनावाने संबोधलं जाऊ लागलं. त्याच्या समर्थकांनी ‘OK Club’ नावाचं एक संघटनही तयार केलं आणि “We are OK” ही घोषणा सगळीकडे घुमू लागली. या राजकीय प्रचारामुळे ‘OK’ हा शब्द घराघरांत पोहोचला आणि मग तर तो थेट भाषेचा भागच बनून गेला.

यापुढे अनेक देशांमध्ये, अगदी वेगवेगळ्या भाषांमध्येही ‘OK’ चा वापर सुरू झाला. कोणताही अनोळखी माणूस असो, भाषा वेगळी असो, पण ‘OK’ म्हटलं की सगळ्यांना समजतं “हो, सगळं व्यवस्थित आहे.”

जगात सर्वाधिक उच्चारला जाणारा शब्द

आज जसं आपण ‘LOL’, ‘BRB’, किंवा ‘OMG’ सारख्या शॉर्टफॉर्म्स वापरतो, तसाच ‘OK’ हा शब्द त्या काळच्या पिढीचा डिजिटल shorthand होता, पण काळाच्या ओघात तो इतका सर्वमान्य आणि सार्वत्रिक झाला की जगात सर्वात जास्त उच्चारला जाणारा शब्दच बनला.

थोडक्यात, ‘OK’ हा शब्द फक्त दोन अक्षरांचा नसून त्यामागे वर्तमानपत्रांचा विनोदी अंदाज, राजकारणाची हुशार खेळी आणि जगभर पसरलेली मानवी संवादाची गरज ही सगळी कहाणी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!