जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकतो. काही दुःखद, काही गोड, पण बहुतांशी अशा की त्या आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. अशाच वेळी, संतांची वाणी आणि त्यांचा अनुभव आपल्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येतो. राधावल्लभ पंथाचे पूज्य संत श्री प्रेमानंद महाराज हे असेच एक मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत, जे भक्तांच्या शंकांना केवळ उत्तर देत नाहीत, तर त्यांच्या जीवनात अध्यात्माची गोडी आणि आशेचा नवीन सूरही निर्माण करतात.

अशाच एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारले, “माझा भूतकाळ मला विसरता येत नाही, मी काय करावे?” हा प्रश्न फार साधा वाटला तरी त्यामागे दडलेली वेदना फार खोल आहे. अनेकांना हा अनुभव येतो. मन भूतकाळात अडकलेलं राहतं, मनःशांती हरवते, आणि भविष्याची दिशा धुसर होते.
काय म्हणाले प्रेमानंद महाराज?
या प्रश्नाचे उत्तर देताना महाराजांनी फार मार्मिक आणि भावस्पर्शी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “सर्व काही विसरून टाका, ही सगळी फक्त स्वप्नं आहेत. जे गेले ते गेले. वर्तमानाची चिंता करा.” हे वाक्य एकाच वेळी कठोर आणि जागृती देणारं आहे. कारण भूतकाळ हे एक निघून गेलेलं वास्तव आहे, ज्याला आपण कितीही इच्छूनही बदलू शकत नाही. पण आपण त्याच्या सावलीत वर्तमान जगणं विसरतो, हे आपल्याला महाराज त्यांच्या साध्या शब्दांत जाणवून देतात.
महाराज पुढे म्हणतात की, तुम्ही वर्तमानात राहा. नवीन विचार करा, नामस्मरण करा, ईश्वराच्या स्मरणात स्वतःला गुंतवा. जे काम करायचं आहे ते धर्माच्या दिशेने असावं, कारण तेच आपल्याला खरी प्रगती देतं. भूतकाळ विसरणं म्हणजे विसरवून टाकणं नव्हे, तर त्याच्या अंधारातून बाहेर येणं. महाराजांच्या मते, जर आपण वर्तमानही भूतकाळाच्या चिंतेत घालवत असू, तर आपण आयुष्याचा मोठा भाग व्यर्थ वाया घालवत आहोत.
नामस्मरणाचा चमत्कार
त्यांच्या या शब्दांमधून एक मोठा संदेश मिळतो “वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे.” जो वेळेचं मोल ओळखतो, तो आयुष्यात खऱ्या अर्थानं महान बनतो. पण जो वेळ वाया घालवतो, तो स्वतःच्या जीवनाचाच अपमान करतो. महाराज स्पष्ट सांगतात की जर तुम्हाला काही विसरता येत नसेल, तर तीच तुमची कमतरता आहे. ती ओळखा, आणि नामस्मरणात स्वतःला गुंतवा. याच नामजपात जीवनाचा खरा अर्थ लपलेला आहे.