जगभरातील महिला खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात कमालीचे यश मिळवले असले, तरी संपत्तीच्या बाबतीत टेनिस, गोल्फ आणि स्कीइंग अशा निवडक खेळांत यश मिळवणाऱ्या महिला आजही आघाडीवर आहेत. नुकतीच जाहीर झालेल्या जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीत आश्चर्यकारक बाब म्हणजे, एकाही भारतीय महिला खेळाडूचे नाव यामध्ये नाही. लाखो चाहत्यांचा पाठिंबा असतानाही आणि जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करूनही, भारतीय महिला खेळाडूंना कमाईच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत स्थान मिळालेले नाही.

टेनिस आणि गोल्फ खेळाडू
या यादीत सर्वाधिक टेनिसपटूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. टेनिसच्या ग्लॅमरसोबतच मोठमोठ्या स्पॉन्सरशिप डील्स, जाहिराती आणि पुरस्कारांनी या खेळाडूंना कोट्यवधींची संपत्ती कमावून दिली आहे. सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत अमेरिकन टेनिस दिग्गज व्हीनस विल्यम्स. त्यांची एकूण संपत्ती सुमारे $95 दशलक्ष इतकी आहे, जी भारतीय चलनात सुमारे ₹820 कोटींपेक्षा अधिक आहे.
या यादीत नाओमी ओसाका दुसऱ्या स्थानावर असून, तिच्याकडे $60 दशलक्ष इतकी संपत्ती आहे. डेन्मार्कची टेनिसपटू कॅरोलिन वोझ्नियाकी तिसऱ्या स्थानावर असून, तिची संपत्ती $55 दशलक्ष आहे. स्वीडनच्या अन्निका सोरेनस्टॅम या महिला गोल्फमधील सर्वोच्च कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असून, त्यांची संपत्ती $40 दशलक्ष आहे.
श्रीमंत स्कीअर खेळाडू
या यादीत अमेरिकेची 21 वर्षीय फ्रीस्टाइल स्कीअर आयलीन गु, पोलंडची विम्बल्डन 2025 विजेती इगा स्वाटेक, बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेन्का आणि रोमानियाची सिमोना हालेप यांचेही नाव आहे. या सर्वांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीसोबतच जाहिराती, ब्रँड अँबॅसिडरशिप आणि मॉडेलिंगद्वारे भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
या यादीत भारताचा कुठलाही सहभाग नसला, तरी ही बाब भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक इशारा मानली जात आहे. भारतीय महिला खेळाडूंनी कामगिरीत भलेही यश मिळवले असले, तरी ब्रँड व्हॅल्यू आणि व्यावसायिक संधी यामध्ये अजूनही मोठी पोकळी जाणवते.