भारतातील रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नाही, तर ती देशाच्या एकात्मतेचं आणि आर्थिक हालचालीचं प्रमुख माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात, हजारो गाड्या देशभर धावतात, आणि कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न यातून मिळतं. पण तुम्ही कधी विचार केलात का देशातलं असं कोणतं राज्य आहे, जिथून सर्वाधिक गाड्या धावतात? आणि कोणत्या राज्यातून भारतीय रेल्वेला सर्वाधिक कमाई होते? याच संदर्भात आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

सर्वाधिक रेल्वेगाड्या धावणारे राज्य
उत्तर प्रदेश हे देशाचं सर्वात दाट लोकवस्तीचं राज्य, आणि याच राज्यातून सर्वाधिक रेल्वेगाड्या धावत असतात. लखनऊ, कानपूर, प्रयागराज आणि वाराणसी सारखी मोठी जंक्शन्स इथं आहेत, जी दररोज शेकडो गाड्यांना हाताळतात. या शहरांतून जाणाऱ्या गाड्या देशाच्या प्रत्येक भागाशी संपर्क ठेवतात. मग ते जम्मू असो, चेन्नई असो, की कोलकाता. उत्तर प्रदेशचं रेल्वे नेटवर्क इतकं विस्तृत आणि जाळ्यागत विणलेलं आहे की त्याला ‘रेल्वेचे हृदय’ असंही म्हटलं जातं.
कमाईच्या बाबतीत कोण पुढे?
दुसरीकडे, कमाईच्या बाबतीत जर कुणी अव्वल असेल, तर तो महाराष्ट्र. विशेषतः मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागांतून जेवढा माल रेल्वेद्वारे वाहून नेला जातो, त्यातून भारतीय रेल्वेचं प्रचंड उत्पन्न होतं. कोळसा, पोलाद, तेल, सिमेंट आणि अन्य औद्योगिक सामग्री मुंबईच्या बंदरांतून देशभर पोहोचते. पश्चिम आणि मध्य रेल्वे विभाग इथं कार्यरत आहेत आणि दोघं मिळून भारतीय रेल्वेच्या एकूण उत्पन्नात मोठा हिस्सा उचलतात. 2022-23 मध्ये सुमारे 65% उत्पन्न हे मालवाहतुकीतून मिळालं आणि त्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता.
उत्तर प्रदेशमधील काही स्थानकं विशेषत्व सांगतात. गोरखपूर स्टेशन, जिथं जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे 1,366 मीटर, ते रोज हजारो प्रवाशांना सेवा देतं. कानपूर आणि प्रयागराज जसे औद्योगिक व शैक्षणिक केंद्रांमुळे प्रवाशांनी कायम गर्दी असते. ही स्थानकं फक्त प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित नाहीत, तर मालवाहतूकही यामधून मोठ्या प्रमाणात केली जाते.
महाराष्ट्रात मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक ऐतिहासिक आणि अत्यंत वर्दळीचं स्थानक आहे. याशिवाय कल्याण, ठाणे, दादर आणि वसई या उपनगरांमधूनही लाखो प्रवासी दररोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. दररोज सुमारे 30 लाखांहून अधिक प्रवासी फक्त मुंबईच्या उपनगरी रेल्वेचा वापर करतात. ही आकडेवारी रेल्वेच्या उत्पन्नात त्यांच्या मोठ्या सहभागाचं स्पष्ट उदाहरण आहे.
पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा
पश्चिम बंगाल देखील या चित्रात मागे नाही. हावडा स्टेशन हे देशातील एक महत्त्वाचं जंक्शन असून, रोज सुमारे 170 गाड्या आणि 10 लाखांहून अधिक प्रवासी इथून जातात. पूर्व रेल्वे क्षेत्रामुळे, विशेषतः कोळसा आणि इतर खनिजांच्या वाहतुकीतून पश्चिम बंगालचाही उत्पन्नात मोठा हातभार लागतो.
झारखंड आणि ओडिशा ही राज्यं मुख्यतः खाणींमुळे ओळखली जातात. कोळसा, बॉक्साईट, लोखंड आणि इतर मौल्यवान खनिजांचा मोठा साठा इथं आहे. 2023-24 मध्ये रेल्वेने 1,588 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आणि त्यात झारखंड-ओडिशाचा वाटा लक्षणीय होता. त्यामुळे पूर्व किनारी रेल्वे क्षेत्र हा मालवाहतुकीतला हद्दपार खेळाडू आहे.
दिल्ली आणि बिहायए
दिल्लीसारखी राजधानीही रेल्वेच्या उत्पन्नात मोठं योगदान देते. नवी दिल्ली स्थानक हे देशातील सर्वात व्यस्त ठिकाण आहे. इथून दररोज 500 पेक्षा अधिक गाड्या सुटतात. राजधानी, शताब्दी, दुरंतो सारख्या वेगवान गाड्यांचा प्रमुख केंद्र हे स्थानक आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गांवरून भरपूर प्रवासी आणि माल गाड्या धावत असल्याने दिल्लीचं रेल्वे उत्पन्नही भरघोस आहे.
बिहारमधील पाटणा आणि गया सारखी स्थानकं देखील खूप गजबजलेली आहेत. इथून अनेक प्रवासी गाड्या सुटतात, विशेषतः उत्तर भारताकडे. प्रवाशांची संख्या भरपूर असली, तरी मालवाहतूक उत्पन्नात बिहार झारखंड आणि ओडिशाच्या मागे आहे. तरीसुद्धा, पूर्व मध्य रेल्वे विभाग बिहारमधून चांगली कमाई करत असतो.
रेल्वेचे 2024-25 मधील उत्पन्न
2024-25 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक विक्रम केला, 2.7 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न. यातील 1.75 लाख कोटी मालवाहतुकीतून, आणि सुमारे 80,000 कोटी प्रवाशांकडून आले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आणि दिल्लीसारखी राज्यं ही उत्पन्नाची इंजिनं आहेत, ज्यांच्याशिवाय भारतीय रेल्वेचा डोलारा कोसळेल.
लवकरच येणार हायड्रोजन ट्रेन
भविष्यात रेल्वेचं चित्र अजून मोठं, वेगवान आणि हरित होणार आहे. 2030 पर्यंत ‘नेट झिरो’ कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवून, भारतीय रेल्वे हायड्रोजन ट्रेनसारखे पर्यावरणपूरक उपाय आणतेय. वंदे भारत, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर भारतात वेग पकडत आहेत, जे केवळ वेग वाढवतील असं नाही, तर उत्पन्नातही मोठा भर टाकतील.