पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात, कोणत्या टाळाव्यात? निरोगी आरोग्यासाठी वाचा या टिप्स!

Published on -

पावसाळा सुरू झाला की, वेगवेगळ्या आजारांचे सावटही वाढत जाते. हवेत असलेली आर्द्रता, जमिनीवर साचलेलं पाणी आणि वातावरणात वाढलेली जीवाणूंची वाढ यामुळे या ऋतूमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः जेवणाच्या बाबतीत थोडी जास्त सतर्कता आवश्यक ठरते. कारण या काळात काही भाज्या खाल्ल्याने आपलं पाचन बिघडू शकतं, तर काही भाज्या आपली प्रतिकारशक्ती वाढवतात आणि आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात.

‘या’ भाज्या खाणे उत्तम

पावसाळ्यात बाजारात भरपूर भाज्या दिसतात, पण सर्व भाज्या खाण्यास योग्यच असतात असं नाही. काही भाज्या अशा असतात ज्या पावसात वाढतात आणि त्यांच्यावर कीटक-रोग होण्याची शक्यता कमी असते. त्यातलाच एक म्हणजे भोपळा. भोपळ्याचं नाव ऐकल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी दिसते, पण खरी गोष्ट ही आहे की, पावसात भोपळा खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. तो पचायला हलका असतो, आणि पाण्याशी संबंध येऊनही त्यावर सहज बुरशी वा कीटक लागत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रोजच्या जेवणात भोपळ्याला जरूर स्थान द्या.

त्याचप्रमाणे, कांटोला म्हणजेच काटेरी परवल किंवा काकोडा ही एक अनोखी भाजी पावसाळ्यात फारच कमी काळासाठी बाजारात दिसते. ती पाहताना थोडी विचित्र वाटू शकते, पण तिचे गुण खूप आहेत. कांटोला खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ती पचन सुधारणारी आहे. त्यामुळे ज्या घरात ही भाजी बनते, तिथे चव आणि आरोग्य एकत्र नांदत असतं.

परवलही या यादीत मागे नाही. उन्हाळा सुरू होताच बाजारात दिसणारी ही भाजी पावसाळ्यातही आरोग्यदायी ठरते. परवलमध्ये असलेलं भरपूर व्हिटॅमिन सी तुमचं इम्युन सिस्टम मजबूत करतं. शिवाय ती पचायला सोपी असल्यामुळे जड वाटणाऱ्या अन्नातून सुटका मिळते. रोजच्या जेवणात परवलचा वापर केल्याने शरीराचं चयापचय सुरळीत राहतं.

अजून एक महत्त्वाची भाजी म्हणजे दिलपसंद ज्याला स्थानिक भाषेत ढेमसे असेही म्हणतात . दिसायला छोटा गोलसर असणारी ही फळभाजी , पावसाळ्यात शरीरात फायबर वाढवण्याचं काम करते, जे पचनासाठी आवश्यक आहे.

‘या’ भाज्या टाळाव्यात

पण या सगळ्या भाज्यांइतकंच महत्त्वाचं म्हणजे कोणत्या भाज्या टाळाव्यात. पावसात पालेभाज्या खाणं टाळावं, कारण पालक, कोबी, राजगिरा, आर्वीसारख्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया, कीटक किंवा कीटकांची अंडी लपलेली असण्याची शक्यता अधिक असते. या भाज्या स्वच्छ धुतल्या गेल्या नाहीत तर त्या पचनासाठीही त्रासदायक ठरू शकतात आणि त्यामुळे पोट फुगणं, गॅस किंवा अपचनासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

म्हणूनच, पावसाळ्यात फक्त चव किंवा आवड पाहून भाज्या निवडू नका. तुमच्या शरीरासाठी काय योग्य आहे, याचा विचार करा. आरोग्यदायी आणि पचायला सोप्या भाज्यांचा समावेश करून तुम्ही तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य या दमट वातावरणातही टिकवून ठेवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!