नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विशेष लक्ष वेधलं ते शुभमन गिलच्या जबरदस्त खेळीने. या युवा कर्णधाराने कसोटीत आपल्या फलंदाजीचा असा झंझावात उडवला की क्रिकेटप्रेमीच नव्हे तर दिग्गज खेळाडूही थक्क झाले. गिलने या सामन्यात तब्बल 269 धावांची भक्कम खेळी साकारत भारतासाठी नव्या इतिहासाची पायाभरणी केली आहे. विशेष म्हणजे या धावसंख्येच्या जोरावर तो भारताच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे.
वीरेंद्र सेहवाग

या यादीत सर्वात वरचं नाव आहे वीरेंद्र सेहवागचं. 2008 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईमध्ये त्याने 319 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने केवळ 304 चेंडूंमध्ये ही खेळी केली होती. त्याआधी, 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्ध मुल्तानमध्ये त्याने 309 धावांची खेळी केली होती, जी भारतीय कसोटी इतिहासातील पहिले त्रिशतक ठरले. त्याने त्यानंतर 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 293 धावा केल्या आणि लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 254 धावांची आक्रमक खेळी साकारली. यामुळे या एकाच फलंदाजाचे नाव या टॉप यादीत तब्बल चार वेळा आहे , हा विक्रम फारच थक्क करणारा आहे.
करुण नायर
सेहवागच्या पाठोपाठ येतो करुण नायरचा उल्लेख, ज्याने आपल्या तिसऱ्याच कसोटी डावात नाबाद 303 धावा करून इतिहास रचला. ही खेळी त्याने इंग्लंडविरुद्ध 2016 मध्ये केली होती. भारताने त्या सामन्यात 759/7 धावा करून डावाने सामना जिंकला.
व्हीव्हीएस लक्ष्मण- राहुल द्रविड
यानंतर लक्ष वेधून घेतो व्हीव्हीएस लक्ष्मणचा 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ईडन गार्डन्समध्ये झळकवलेला 281 धावांचा अविस्मरणीय डाव. त्या सामन्यात त्याने राहुल द्रविडसोबत 376 धावांची भागीदारी करत भारताचा पराभव विजयात बदलला होता. द्रविडचं नावही यादीत आहे. त्याने 2004 मध्ये रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध 270 धावांची संयमी खेळी केली होती.
विराट कोहली
विराट कोहलीचं नावही यात आहे. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात त्याने नाबाद 254 धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी संयम, फलंदाजी कौशल्य आणि मानसिक ताकदीचं उत्तम उदाहरण होती.
सचिन तेंडुलकर
अखेरचा उल्लेख करायचा झाला, तर त्याशिवाय यादी पूर्ण होणार नाही तो म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिनने ढाका येथे बांगलादेशविरुद्ध 248 नाबाद धावा केल्या होत्या. त्याचा हा डाव कसोटीत त्याचा सर्वोच्च ठरला आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
शुभमन गिल
शुभमन गिलच्या 269 धावांनी केवळ त्याला या यादीत स्थान दिलं नाही, तर एका नव्या युगाची सुरूवात केली आहे. एका तरुण कर्णधाराने परदेशी भूमीवर असा डाव खेळणं ही नक्कीच आशादायक बाब आहे.