भारतीय चलनातील ‘₹’ हे चिन्ह कोणी डिझाईन केलं?, जाणून घ्या त्यामागची प्रेरणादायी गोष्ट!

भारतीय रुपया हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. चहा घेण्यापासून ते घर खरेदीपर्यंतच्या प्रत्येक व्यवहारात रुपयाला एक खास स्थान आहे. पण ज्या चिन्हाने आपण हा रुपया ओळखतो म्हणजेच ‘₹’ त्यामागे एक खास गोष्ट लपलेली आहे. हे चिन्ह आपल्याला आता इतकं परिचित झालं आहे की त्याचा उगम नेमका कुठून झाला हे आपण अनेकदा विसरतो. चलनाशी इतकं घट्ट जोडलेलं असलेलं हे चिन्ह कोणी आणि कसे तयार केलं यामागची कहाणी अतिशय रंजक आहे.

चलनातील ‘₹’ मागचं रहस्य

खरं तर, पूर्वीच्या काळात भारतीय रुपयाला असं कोणतंही विशिष्ट चिन्ह नव्हतं. ‘Rs.’ असं इंग्रजीत लिहूनच आपण त्याचा उल्लेख करत होतो. पण भारताची ओळख जागतिक पातळीवर अधिक ठळक व्हावी, आणि भारतीय रुपया हा डॉलर, पाउंड, युरो यासारख्या आंतरराष्ट्रीय चलनांप्रमाणे एक वेगळा दर्जा मिळवावा यासाठी भारत सरकारने एक पाऊल उचललं. वर्ष होतं 2010. सरकारने एक खुली स्पर्धा जाहीर केली. उद्देश होता असा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारतीय वाटणारा चिन्ह तयार करणं, जे देशाच्या आर्थिक अस्मितेचं प्रतीक बनू शकेल.

या स्पर्धेत देशभरातून हजारो डिझाइन आले. पण सगळ्यांना मागे टाकत एक तरुण पुढे आला, चेन्नईचा उदय कुमार. त्याने संस्कृतमधील ‘रा’ आणि इंग्रजीतील ‘R’ या दोन्ही अक्षरांच्या शैलींचं मिश्रण करून एक नावीन्यपूर्ण चिन्ह तयार केलं. जे ना केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षक होतं, तर भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीलाही साजेसं होतं. त्याच्या या कल्पकतेनेच ‘₹’ हे रुपयाचं अधिकृत चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं.

या निर्णयानंतर भारताच्या चलनाचं रूप पूर्णपणे बदलून गेलं. आज आपण जी नोटा किंवा नाणी वापरतो, त्यावर हे ‘₹’ चिन्ह स्पष्ट दिसतं. हे केवळ एक चिन्ह नाही, तर भारताच्या आर्थिक सशक्ततेचं आणि सांस्कृतिक ठसा असलेल्या आधुनिकतेचं प्रतीक बनलं आहे.

उदय कुमार यांनी तयार केलं चिन्ह

विशेष म्हणजे, या स्पर्धेत उदय कुमारसोबत आणखीही अनेक प्रतिभावानांनी आपले डिझाइन सादर केले होते. त्यात कोलकाताचे नोंदिता कोरिया मेहरोत्रा यांचाही समावेश होता. पण अखेर उदय कुमार यांच्या रचनेला अधिक व्यापक अर्थ आणि अभिजात सौंदर्यामुळे मान्यता मिळाली.

आज स्पर्धा परीक्षा असो की सामान्य ज्ञानाच्या गप्पा ‘₹’ हे चिन्ह कोणी डिझाइन केलं हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आणि त्याचं उत्तर आहे, उदय कुमार. एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, जो अगदी UPSCसारख्या कठीण परीक्षेतसुद्धा अनेकांना चुकतो.