आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटचा इतिहास हा केवळ फलंदाजांच्या खेळीने रंगलेला नाही, तर वेगवान व फिरकी गोलंदाजांच्या अचूक आणि आक्रमक कामगिरीनेही तो कायम उजळून निघालेला आहे. क्रिकेट रसिकांच्या नजरेत ‘नंबर-1’ गोलंदाज होणे म्हणजे फक्त दर्जेदार खेळी नव्हे, तर सातत्य, मनगटात ताकद, संयम आणि संघासाठी झटण्याची वृत्ती दर्शवणारी ओळख असते. आयसीसी कसोटी क्रमवारीत अनेक महान खेळाडूंनी ही जागा पटकावली, पण त्यात काहींनी ही स्थानं दीर्घकाळ राखली, आणि इतिहासात स्वतःचे नाव कोरले.
जसप्रीत बुमराह सध्या नंबर 1 वर

भारतीय चाहत्यांसाठी सध्या एक अभिमानाची गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराहचा क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला दबदबा. बुमराह सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवत आहे आणि त्याने आपल्या वेगळ्या शैलीतील गोलंदाजीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो आधुनिक क्रिकेटचा सर्वोच्च गोलंदाज आहे. मात्र, जेव्हा आपण सर्वाधिक काळ पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या गोलंदाजांविषयी बोलतो, तेव्हा काही दिग्गज नावे समोर येतात.
डेल स्टेन
या यादीत सर्वात वर आहे डेल स्टेन. दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज केवळ त्याच्या वेगासाठी नव्हे, तर अचूकतेसाठीही ओळखला जातो. स्टेन तब्बल 2,343 दिवस कसोटी क्रमवारीत नंबर-1 राहिला. 93 कसोट्यांत त्याने घेतलेली 439 बळी ही संख्या त्याच्या सातत्याची साक्ष आहे. त्याच्या चेंडूंमध्ये अशी काही जादू होती की तो प्रतिस्पर्ध्यांच्या मनात दहशत निर्माण करत असे.
कर्टली अॅम्ब्रोस
दुसरे नाव आहे वेस्ट इंडिजचा भीतीदायक गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोस. 6 फूट 7 इंच उंचीचा आणि शांत स्वभाव असलेला अॅम्ब्रोस 1,719 दिवस जगातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने 98 कसोट्यांत 405 विकेट्स घेतल्या. त्याच्या प्रत्येक स्पेलमध्ये असलेली धार अजूनही जुने क्रिकेट प्रेमी विसरू शकलेले नाहीत.
मुथय्या मुरलीधरन
तिसऱ्या क्रमांकावर आहे श्रीलंकेचा फिरकीचा जादूगार मुथय्या मुरलीधरन. त्याने 1,711 दिवस पहिल्या क्रमांकावर राहून एक वेगळीच उंची गाठली. मुरलीधरनने घेतलेले 800 कसोटी बळी ही तर विक्रमाची कमाल आहे. त्याचा चेंडू पिचवर पडल्यावर काय करेल याचा अंदाज लावणे अवघड असे.
पॅट कमिन्स
ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स या यादीत चौथ्या स्थानी आहे. सध्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या कमिन्सने 1,313 दिवस पहिलं स्थान राखलं. त्याच्या गोलंदाजीत शक्ती, आक्रमकता आणि रणनीती यांचे अद्वितीय मिश्रण आहे. 71 कसोट्यांत त्याने 309 विकेट्स घेतल्या आहेत.
ग्लेन मॅकग्राथ
पाचव्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा अजून एक दिग्गज ग्लेन मॅकग्राथ. तो 1,306 दिवस कसोटी क्रमवारीत अव्वल होता. त्याच्या अचूक लाईन-लेंथमुळे फलंदाजांची परीक्षा घेतली जायची. मॅकग्राथने आपल्या कारकिर्दीत 124 कसोट्यांत 563 बळी घेतले, आणि तो आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.
या यादीत भारतीय खेळाडू नसणं थोडं खंतजनक वाटतं, परंतु जसप्रीत बुमराहच्या रूपाने भारताने आता एक अशी आशा जागवली आहे, की तोही या दिग्गजांच्या पंक्तीत लवकरच कायमचं स्थान मिळवेल.