रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. या चित्रपटाविषयी जितकी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे, तितकीच चर्चा आता सनी देओलच्या भूमिकेभोवतीही फिरते आहे. हनुमानाच्या रूपात सनी देओल मोठ्या पडद्यावर झळकणार हे जरी आधीच जाहीर झालं असलं, तरी आता त्याची भूमिका किती वेळेसाठी असणार, यावरूनच चर्चा सुरु झाली आहे.

सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत
‘रामायण’ ही भारतीय संस्कृतीच्या मुळाशी असलेली एक महाकाव्य गाथा. त्याचे चित्रपटात रूपांतर हे केवळ मोठं धाडस नव्हे, तर त्यातल्या प्रत्येक पात्रासाठी असलेली लोकांच्या मनातील आदराची भावना देखील खूप मोठी जबाबदारी घेऊन येते. त्यामुळेच, सनी देओलसारखा बड्या व्यक्तिमत्त्वाचा अभिनेता जेव्हा हनुमानाच्या भूमिकेसाठी समोर येतो, तेव्हा लोकांच्या अपेक्षा आणखी वाढतात.
मात्र सध्या माध्यमांमध्ये असं म्हटलं जातंय की ‘रामायण भाग 1’ मध्ये सनी देओल केवळ 15 मिनिटांसाठीच दिसेल. कथा तिथे संपेल जिथे हनुमान श्रीरामांना प्रथमच भेटतात. त्याचा अर्थ, त्यांच्या भूमिकेचा खरा प्रवास दुसऱ्या भागात सुरू होईल. म्हणजेच ‘रामायण भाग 2’ मध्ये हनुमानाचा अधिक प्रभावशाली, भावनिक आणि निर्णायक भाग उलगडेल जिथे ते सीतेच्या शोधात श्रीरामांना मदत करतात, लंकेला जातात, आणि आपलं संपूर्ण शौर्य दाखवतात.
यश रावणाच्या भूमिकेत
याच चित्रपटात ‘केजीएफ’ फेम सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत झळकणार असल्याचंही समोर आलं आहे. मात्र त्यांच्या स्क्रीन टाइमबाबत देखील सध्या उलटसुलट चर्चा आहे. काही रिपोर्ट्समध्ये त्यांचा रोल पहिल्या भागात फार कमी असेल असं म्हटलं जातं, तर काहींनी ते स्पष्ट फेटाळलं आहे. विशेष म्हणजे, यश या भव्य चित्रपटाचे केवळ कलाकार नसून ते निर्माता देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
चित्रपटाचे बजेट
चित्रपटाचं बजेटही थक्क करणारे आहे. एकट्या पहिल्या भागासाठी सुमारे 835 कोटी रुपये खर्च केला जाणार असून, दोन्ही भाग मिळून हे बजेट 1,600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. भारतीय सिनेमासाठी हे बजेट एका नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते. रणबीर कपूर, यश, सनी देओल, साई पल्लवी, रवी दुबे, विवेक ओबेरॉय आणि अरुण गोविल यांसारख्या अनुभवी कलाकारांचा यात समावेश आहे, जे या चित्रपटाची भव्यता आणखी वाढवतात.
कधी रिलीज होणार?
चित्रपटाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, तर दुसरा भाग 2027 मध्ये येईल. यामध्ये कोणाच्या भूमिकेला किती वेळ देण्यात येणार आहे याबाबत अजून कोणताही अधिकृत खुलासा निर्मात्यांनी केलेला नाही.