आपण जेव्हा आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांकडे पाहतो, तेव्हा एक गोष्ट अगदी सहज लक्षात येते, ती म्हणजे त्यांच्या रंगाची निवड. जगभरातील बहुतांश विमानं पांढऱ्या रंगाचीच का असतात, याचा आपण विचार कधी केला आहे का? ही निवड केवळ सौंदर्यदृष्टिकोनातून नाही, तर यामागे अनेक वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यावसायिक कारणं आहेत, जी आज आपण समजून घेणार आहोत.

विमानांच्या रंगाविषयी विचार करताना सर्वात पहिले लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे ‘वजन’. होय, अगदी रंगाचंही वजन असतं. गडद रंग वापरला, तर त्यासाठी अधिक कोट लागतात, ज्यामुळे विमानाचं एकूण वजन वाढतं. पण पांढरा रंग हलकाच असतो आणि कमी थरात चांगलं कव्हरिंग देतो. एकंदरीत, तो 8 प्रवाशांच्या वजनाइतकी बचत करून देतो आणि विमानात प्रत्येक किलो महत्त्वाचं असतं. यामुळे इंधन वाचतं आणि पर्यायाने खर्च कमी होतो.
पांढऱ्या रंगाचे महत्व
पांढऱ्या रंगाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे देखभाल सुलभ होते. हा रंग न फिकट होणारा, न मोडणारा म्हणजेच दीर्घकाळ टिकणारा असतो. तसंच, जर विमानाच्या बाहेर कुठे भेग, गळती किंवा खरचटलेली जागा असेल, तर ती लगेच डोळ्यात भरते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही पांढरा रंग एकदम आदर्श ठरतो. लवकर निदान झालं की वेळेवर दुरुस्ती करता येते, आणि मोठा अपघात टाळता येतो.
तापमानाचा विचार केला, तर पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, त्यामुळे विमानाच्या आत उष्णता फारशी वाढत नाही. हे प्रवाशांच्या सोयीसाठी तर महत्त्वाचं आहेच, पण तांत्रिक उपकरणांच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. गडद रंग उष्णता शोषतो, त्यामुळे उड्डाण करताना विमान अधिक गरम होण्याची शक्यता असते, जी यंत्रणांवर परिणाम करू शकते.
हवाई वाहतूक नियंत्रणासाठीही पांढरा रंग फायदेशीर ठरतो. तो दिवसाच्या कोणत्याही वेळेस आणि ढगांच्या दरम्यान देखील स्पष्टपणे दिसतो. हे इतर विमानांना किंवा नियंत्रण कक्षातील रडारला विमान ओळखण्यात मदत करतं. अपघात टाळण्यासाठी हे एक महत्त्वाचं कारण आहे.
‘रिसेल व्हॅल्यू’ वाढते
पांढऱ्या रंगाचे आणखी एक व्यावसायिक कारण आहे, त्याचं ‘रिसेल व्हॅल्यू’. जर एखादं विमान दुसऱ्या कंपनीला विकायचं असेल, तर पांढऱ्या विमानावर त्यांचा ब्रँड रंगवणं सोपं असतं. त्यामुळे पांढऱ्या विमानांना जास्त मागणी असते. शिवाय हा रंग स्वच्छ, व्यावसायिक आणि प्रतिष्ठेचा वाटतो. कंपनीच्या ब्रँडिंगसाठी एकदम योग्य.