भारतातील बहुतांश गावांच्या नावानंतर ‘पूर’, ‘बाद’ आणि ‘गंज’च का लावले जाते? यामागेही दडलाय अद्भुत इतिहास!

Published on -

भारतात फिरताना आपल्याला अशी असंख्य गावं आणि शहरे दिसतात, ज्यांच्या नावांमध्ये ‘पूर’, ‘बाद’ किंवा ‘गंज’ हे शब्द असतात. पण कधी विचार केलात का, यामागचं खरं कारण काय आहे? आपण रोज वापरत असलेल्या या नावांमध्ये इतिहासाचा, संस्कृतीचा आणि भूगोलाचा एक अमूल्य ठेवा दडलेला आहे.

‘पूर’ मागील अर्थ

शहराच्या किंवा गावाच्या नावात ‘पूर’ हा शब्द दिसला, तर त्यामागे एक राजकीय आणि सामरिक संदर्भ लपलेला असतो. ‘पूर’ हा शब्द संस्कृतमधून आला आहे, ज्याचा अर्थ असतो ‘किल्ला’ किंवा ‘सुरक्षित वसाहत’. इतिहासात अशा अनेक स्थळांवर राजे-महाराज्यांनी आपले साम्राज्य उभारले होते, किल्ले बांधले होते आणि सुरक्षित ठिकाणी आपली राजधानी वसवली होती. म्हणूनच जयपूर, जोधपूर, उदयपूर, रामपूर यासारखी शहरे केवळ नावानेच नव्हे, तर त्यांच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक रचनेमुळेही महत्त्वाची ठरली.

‘बाद’ किंवा ‘आबाद’

दुसरीकडे, ‘बाद’ किंवा ‘आबाद’ हा शब्द पर्शियन भाषेतून आपल्याकडे आला. ‘आब’ म्हणजे पाणी आणि ‘आबाद’ म्हणजे पाण्याने समृद्ध अशी जागा. जे गाव किंवा शहर नदीच्या काठावर, तलावाजवळ किंवा जलस्रोताजवळ वसलेलं असेल, त्याला ‘बाद’ जोडून नाव दिलं जाई. त्यामुळेच गाझियाबाद, मुरादाबाद, अहमदाबाद यांसारखी शहरे पाण्याच्या अस्तित्वामुळे एके काळी भरभराटीस आली होती. म्हणजेच या नावामागे केवळ सौंदर्य नाही, तर त्या भागातील पाण्याच्या उपलब्धतेचा आणि पर्यावरणाच्या निकटतेचा अर्थ दडलेला आहे.

‘गंज’

‘गंज’ या शब्दाचा इतिहास थोडा वेगळा आणि अधिक उत्सुकतेचा आहे. हा देखील पर्शियन भाषेतून आलेला शब्द आहे, ज्याचा मूळ अर्थ ‘खजिना’ असा होतो. जुन्या काळात जिथे खजिना साठवला जायचा, खरेदी-विक्रीसाठी संपत्तीचे आदान-प्रदान व्हायचं, त्या भागाला ‘गंज’ असं नाव दिलं जाई. जसजसा काळ बदलत गेला, तसतसे हे खजिन्याचे ठिकाण मोठ्या बाजारपेठांमध्ये रुपांतरित झाले आणि ‘गंज’ हा शब्द त्या अर्थानेच वापरला जाऊ लागला. दर्यागंज, फैजगंज, दातागंज यासारख्या ठिकाणी आजही बाजारपेठा गजबजलेल्या आहेत, पण त्यांच्या नावात खजिन्याचा मागमूस अजूनही सापडतो.

या सगळ्या नावांमध्ये केवळ शब्दांचे सुमारे नाहीत, तर त्या त्या ठिकाणच्या संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि राजकीय-भौगोलिक इतिहासाचा खोलवर संबंध आहे. प्रत्येक ‘पूर’ आपल्याला त्या भागातील राजसत्तेची आठवण करून देतो, प्रत्येक ‘बाद’ आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात नेतो, तर प्रत्येक ‘गंज’ व्यापाराच्या वर्दळीची आणि समृद्धीची साक्ष देतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!