हिंदू धर्मातील प्रत्येक विधी केवळ एक औपचारिकता नसून त्यामागे खोल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो. लग्नानंतर नववधूच्या गृहप्रवेशाच्या वेळी पार पडणारी एक अशीच परंपरा म्हणजे, पायांनी तांदळाने भरलेला कलश उडवण्याची प्रथा. हे दृश्य आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे, पण खरे कारण आजही अनेकांना माहिती नसते.

धार्मिक परंपरा
सनातन धर्मात एकूण 16 संस्कार सांगितले आहेत, त्यामध्ये गर्भधारणेपासून विवाहापर्यंत सर्व महत्वाच्या टप्प्यांचा समावेश आहे. विवाहानंतर जेव्हा वधू नव्या घरात प्रवेश करते, तेव्हा ती तिच्या उजव्या पायाने घराच्या दारावर ठेवलेल्या तांदळाने भरलेल्या कलशावर लाथ मारते. हे केवळ स्वागताचे लक्षण नसून नव्या सुरुवातीचे आणि समृद्ध जीवनाचे प्रतीक आहे.
तांदूळ आणि कलश या दोन्ही गोष्टी हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानल्या जातात. तांदूळ म्हणजे अक्षत तो संपत्ती, शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे. कलश म्हणजे विश्वाचे प्रतिकात्मक स्वरूप ,जिथे ब्रह्मांडाची ऊर्जा साठवलेली असते. वधू जेव्हा पायाने हा कलश उडवते, तेव्हा ती त्या घरात लक्ष्मीचे आगमन घडवते, असे मानले जाते.
वास्तविक, हिंदू कुटुंबांमध्ये वधूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ती घरात प्रवेश करताच सुख, समृद्धी, आरोग्य, अन्न आणि सौख्य यांचे आगमन होते, असा विश्वास आहे. म्हणूनच तिला पायांनी कलश उडवण्यास सांगितले जाते, जे तिच्या पावलेमुळे घरात नवे भाग्य येत आहे, याचे प्रतीक आहे.
मानसशास्त्रीय अर्थ
या परंपरेमागे एक मानसशास्त्रीय अर्थही आहे. नववधूसाठी विवाहानंतरचे वातावरण नवखे आणि थोडे तणावपूर्ण असते. त्यामुळे घरात तिचे स्वागत आदराने होत आहे, हे दाखवण्यासाठी तिच्या हातात नाही तर पायात कलश पाडण्याचा हक्क दिला जातो. यामुळे तिला स्वतःला घरातील महत्त्वाची व्यक्ती असल्याची जाणीव होते.
ही परंपरा फक्त धार्मिकच नाही, तर नव्या सुरुवातीचा एक अत्यंत गोड आणि आशयपूर्ण क्षण असतो. नववधूच्या पावलांनी केवळ घरात अन्नधान्य येत नाही, तर शुभतेची ऊर्जा, सौंदर्य आणि भावनिक आधारसुद्धा येतो आणि याचसाठी कलश पाडण्याची परंपरा आजही कायम आहे.