लग्न म्हटलं की फक्त दोन जीवांचं एकत्र येणं नाही, तर दोन कुटुंबांचा, संस्कृतींचा आणि भावनांचा संगम असतो. अशा या पवित्र विधीत काही गोष्टी अत्यावश्यक मानल्या जातात, ज्या केवळ परंपरेपुरत्या नाही, तर खोल भावनिक आणि आध्यात्मिक अर्थाने देखील खूप महत्त्वाच्या असतात. त्यापैकीच एक म्हणजे, दुर्वा गवत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे साधंसं दिसणारं हिरवं गवत पती-पत्नीच्या जीवनातील पहिल्या पायरीवर एक अमूल्य पाठराखं बनून उभं असतं.’

दुर्वा गवताचं महत्व
उत्तराखंडमधील कुमाऊं आणि गढवाल प्रदेशात दुर्वा किंवा दुबे गवताशिवाय लग्नाची कल्पनाच केली जात नाही. इथल्या परंपरेनुसार, हे गवत इतकं पवित्र मानलं जातं की त्याशिवाय लग्न विधी अपूर्ण समजला जातो. विशेष म्हणजे हे गवत कोणत्याही साध्या झाडासारखं नाही, तर ते थेट गणपती बाप्पांच्या आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच लग्नाच्या शुभमुहूर्ताची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते आणि त्यात दुर्वेचं स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं.
दुर्वा गवताचं हे महत्त्व फक्त धार्मिक स्तरावर नाही. यामागे एक भावनिक, प्रतीकात्मक संदेशही दडलेला आहे. लग्नाच्या विधीत वधू-वरामध्ये हे गवत ठेवलं जातं. यामागचा अर्थ अगदी हृदयस्पर्शी आहे. दुर्वा कितीही वेळा कापलं तरी पुन्हा पुन्हा वाढतं, त्याचप्रमाणे नवदांपत्याचं नातंही अडचणींनंतर नव्याने फुलावं, हे या छोट्याशा हिरव्या गवतातून सूचित केलं जातं.
सुख, शांती, सौभाग्याचं प्रतीक
फक्त लग्नातच नाही, तर संपूर्ण घरामध्ये आनंद आणि शुभतेचा संचार व्हावा म्हणूनही दुर्वेचा वापर केला जातो. असं मानलं जातं की दुर्वा गवत नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि घरात सुख, शांती, सौभाग्य यांचं स्वागत करतं.
म्हणूनच मंडपाची सजावट असो, पूजा साहित्य असो किंवा वराला सजवण्याचा प्रसंग, दुर्वेचं स्थान अढळ असतं. विशेष म्हणजे हे गवत कोणत्याही दुकानातून सहज विकत घेतलं जात नाही, तर वराच्या बाजूचे लोक ते जंगल किंवा शेतामधून खास श्रद्धेने निवडून आणतात.