रेल्वे रुळांवरून ट्रेन वेगाने धावत असते तेव्हा आपण ती फक्त एक भल्या मोठ्या यंत्रासारखी पाहतो. पण या धावणाऱ्या ट्रेनच्या मागे अनेक तांत्रिक गोष्टी लपलेल्या असतात, ज्या तिच्या सुरक्षित, सुरळीत आणि अचूक धावण्याची खात्री देतात. अशीच एक महत्त्वाची बाब म्हणजे, रेल्वे रुळांभोवती आणि त्याच्या मध्ये ठेवले जाणारे लहान खडे. तुम्हीही कधी तरी हे दगड पाहिले असतील आणि मनात प्रश्नही आला असेल हे दगड इथे का टाकले जातात?

हे दगड साधेसुधे नसतात. त्यांना “बॅलास्ट” म्हणतात आणि ते रेल्वे रुळांच्या सुरक्षेचं गुपित असतात. यांच्याशिवाय रुळ इतके मजबूत राहू शकत नाहीत, आणि त्यामुळेच ट्रेनचं सुरक्षीत धावणं धोक्यात येऊ शकतं.
बॅलास्ट खडकामुळे ट्रेन राहते सुरक्षित
ट्रेन ही वजनदार आणि वेगवान असते. ती जेव्हा ट्रॅकवरून धावते, तेव्हा तिच्या खालचं सर्व काही जबरदस्त दाबाखाली असतं. अशा वेळी रुळ हलू नयेत, जमिनीत बुडू नयेत आणि त्यांच्या रचनेत कोणताही बदल होऊ नये याची खात्री बॅलास्ट नावाचे हे छोटे पण मजबूत दगड देतात. हे दगड एकमेकांशी घट्ट चिकटल्यासारखे असतात, ज्यामुळे ट्रॅक मजबूत आणि स्थिर राहतो.
पावसाळ्यात, जर हे दगड नसते, तर रुळांभोवती पाणी साचलं असतं, माती ओलसर होऊन सैल झाली असती, आणि ट्रॅक जमिनीत थोडा थोडा झुकायला लागला असता. पण बॅलास्टमध्ये रिकामी जागा असते, जी पाण्याला झिरपून बाहेर जाण्याचा मार्ग देते. त्यामुळे रुळ कोरडे राहतात आणि गंजण्यापासूनही वाचतात.
ध्वनीप्रदूषणही कमी होते
ट्रेन धावताना कंपन निर्माण होतो आणि मोठा आवाजही येतो. बॅलास्ट या कंपनांना थोपवतो आणि आवाज कमी करतो. त्यामुळे आसपासच्या भागात ध्वनीप्रदूषणही आटोक्यात राहतं.
तापमान बदलांचाही रेल्वे ट्रॅकवर परिणाम होतो. उन्हात ते फुगतात आणि थंडीत आकुंचन पावतात. पण बॅलास्ट या बदलांमुळे ट्रॅकमध्ये होणारी हालचाल मर्यादित करतो, ज्यामुळे रुळांमध्ये तडे जाण्याचा धोका कमी होतो.
अपघात टळतात
बॅलास्टचं आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे वनस्पतींना वाढू न देणं. जर ट्रॅकच्या आजूबाजूला माती असती, तर गवत, झुडूप उगवू लागलं असतं. त्यांचे मुळे ट्रॅकखाली शिरून त्याला सैल करू शकतात. पण बॅलास्टमध्ये पोषणद्रव्यंचा अभाव असल्यामुळे तिथे काहीच उगवत नाही.