मुंबईच्या समृद्ध आणि गजबजलेल्या परिसरात, जिथे इंचभर जागा देखील अमूल्य मानली जाते, तिथे एक भव्य आणि दिव्य वास्तू उभी आहे अँटिलिया. ही इमारत केवळ उंचीनेच नव्हे तर तिच्या नावाने, संकल्पनेने आणि समृद्धतेच्या व्याख्येनेही अनेकांच्या मनात कौतुक निर्माण करते. मुकेश अंबानी यांच्या या घराविषयी आपण अनेकदा ऐकतो, पण तुम्हाला माहिती आहे का की ‘अँटिलिया’ या नावाचा अर्थ काय आहे? आणि हेच नाव निवडण्यामागे अंबानी कुटुंबाचा नेमका विचार काय होता?

‘अँटिलिया’ नावामागील अर्थ
‘अँटिलिया’ हे नाव एका पौराणिक बेटावरून घेतले गेले आहे, जे अटलांटिक महासागरात असण्याचा उल्लेख मध्ययुगीन युरोपीय नकाशांमध्ये आढळतो. हे बेट वास्तवात अस्तित्वात असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसला, तरी त्याच्याभोवती अनेक गोष्टींच्या, स्वप्नांच्या आणि दुर्मिळतेच्या कथा गुंफल्या गेल्या आहेत. हे बेट म्हणजे समृद्धी, अनोखेपणा आणि गूढतेचे प्रतीक मानले गेले आहे आणि अचूकपणे हेच तीन गुणधर्म अंबानी कुटुंबाच्या घरातही प्रतिबिंबित होतात.
मुकेश अंबानी यांचे 27 मजली घर म्हणजे एका आलीशान वास्तुचा एक अनोखा नमूनाच आहे. यामध्ये 6 मजले केवळ पार्किंगसाठी राखीव असून 168 गाड्या एकाच वेळी उभ्या राहू शकतात. घराच्या विविध भागांमध्ये खासगी जिम, 4 स्विमिंग पूल, योगा स्टुडिओ, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, 3 हेलिपॅड्स, आणि अगदी खासगी मंदिर सुद्धा आहे. इतकंच नव्हे, तर इथे 50 आसनी खासगी सिनेमा हॉल देखील आहे आणि प्रत्येक मजल्याचे डिझाइन इतकं अनोखं आहे की प्रत्येक मजल्यावरून वेगळा अनुभव मिळतो.
6,000 कोटी खर्चून उभा राहिला ‘अँटिलिया’
या अद्वितीय वास्तूचे आर्किटेक्चर अमेरिकेतील ‘पर्किन्स अँड विल’ या प्रसिद्ध आर्किटेक्ट्सनी तयार केले असून ऑस्ट्रेलियन कंपनी ‘लीटन होल्डिंग्ज’ ने याचे बांधकाम पूर्ण केले.
2016 साली या इमारतीचा खर्च जवळपास 6,000 कोटी रुपये होता आणि आज ती सुमारे 15,000 कोटी रुपये किंमतीची असल्याचे मानले जाते.