जगातील विविध संकटांनी आधीच चिंतेचं वातावरण निर्माण झालं असताना, एक नवीन आणि धक्कादायक भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. या वेळी केंद्रस्थानी आहेत ‘जपानी बाबा वेंगा’ म्हणून ओळख मिळवत असलेले रियो तात्सुकी, ज्यांनी 5 जुलै 2025 रोजी संभाव्य “प्रलयसदृश” नैसर्गिक आपत्तीचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याने ना फक्त सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे, तर प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातही याचा मोठा परिणाम दिसून येतोय.

रियो तात्सुकी यांची भविष्यवाणी
तात्सुकी यांच्या भाकितांना विशेष महत्त्व यामुळे दिलं जातं की, त्यांनी याआधी ‘द फ्युचर आय सॉ’ नावाच्या 1999 मध्ये प्रकाशित झालेल्या मंगा मालिकेत काही आश्चर्यजनक अचूक अंदाज व्यक्त केले होते. त्यामध्ये कोविड-19 सारख्या महामारीचा उल्लेख होता, जो 21 वर्षांनंतर प्रत्यक्ष घडल्याने लोकांचा त्यांच्या भाकितांवरचा विश्वास अधिक वाढला. आता जेव्हा त्यांनी 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये मोठा भूकंप किंवा त्सुनामी येण्याचा इशारा दिला आहे, तेव्हा पुन्हा भीतीचे सावट पसरू लागले आहे.
तात्सुकी यांच्या मते, जपान आणि फिलिपिन्सच्या दरम्यान समुद्राखाली मोठी दरड कोसळू शकते, ज्यामुळे समुद्रात तीव्र अशांतता निर्माण होईल आणि त्या लाटांचे परिणाम 2011 च्या विनाशकारी त्सुनामीहूनही अधिक धोकादायक ठरतील. जपानचा भूकंपीय इतिहास लक्षात घेतला तर ही शक्यता अजिबात दुर्लक्षित करता येत नाही. खरंतर जपानमध्ये लहान-मोठ्या भूकंपांचे प्रमाण इतकं वाढलं आहे की, अशा इशाऱ्यांना तिथली लोकसंख्या नेहमीच थोडं गांभीर्याने घेते.
जपानमधील पर्यटनावर परिणाम
याचा परिणाम लगेचच दिसू लागला आहे. जपानकडे जाणाऱ्या हाँगकाँगच्या विमान बुकिंगमध्ये तब्बल 83% इतकी घट झाली आहे. प्रवासी जूनच्या अखेरीपासूनच आपले नियोजित दौरे रद्द करत आहेत. एवढंच नाही, तर हाँगकाँग एअरलाइन्सने दक्षिण जपानी शहरांकडे जाणाऱ्या काही उड्डाणांमध्येही बदल केला असून बोईंग फ्लाइट्समध्येही 50% पर्यंत घट झाली आहे.
हे भाकित खरंच खरे ठरणार का? यावर अजून कोणतीही वैज्ञानिक पुष्टी मिळालेली नाही. सध्या या आपत्तीचा कोणताही थेट पुरावा नाही, पण जपानसारख्या भूगर्भीयदृष्ट्या संवेदनशील देशात अशा शक्यतेकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच, अशा इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे.