एका सामान्य ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आलेली अभिनेत्री आज संपूर्ण देशाच्या मनोरंजनविश्वावर राज्य करतेय. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून साऊथ स्टार नयनतारा आहे. वयाच्या 27 व्या वर्षी धर्मांतर करून, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या ओळखी निर्माण करत, नयनताराने स्वतःचा एक स्वतंत्र आणि तेजस्वी मार्ग निर्माण केला आहे. आज तिचं नाव देशभरात पोहोचलं आहे.

अभिनेत्री नयनताराचा प्रवास
नयनताराचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 रोजी कर्नाटकमधील एका ख्रिश्चन कुटुंबात ‘डायना मरियम कुरियन’ या नावाने झाला. तिचं बालपण खूप शिस्तीच्या वातावरणात गेलं. मात्र, तिच्या जीवनाचा निर्णायक टप्पा आला 2011 साली, जेव्हा तिने आर्य समाज मंदिरात विधिपूर्वक हिंदू धर्म स्वीकारला. तेव्हापासून तिचं नाव ‘नयनतारा’ असं पक्कं झालं आणि तिच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. हे परिवर्तन केवळ धार्मिक नव्हतं, तर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला नवीन उभारी देणारं ठरलं.
तिचं प्रेमप्रकरणही तितकाच चर्चेचा विषय ठरला. एकेकाळी प्रभु देवाशी तिचे अतूट प्रेमसंबंध होते. त्यासाठी तिने अनेक चित्रपटांना नकारही दिला. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही. नयनताराने त्या फेजमधून स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा आपल्याच पायावर उभी राहिली.
नयनताराची संपत्ती
आज नयनतारा केवळ दक्षिणेतील सुपरस्टार नसून ती अखंड भारतात ओळखली जाते. तिच्याकडे 200 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी ती 5 ते 10 कोटी रुपये मानधन घेते आणि तिच्याकडे स्वतःचा खाजगी जेटही आहे, जो तिने तब्बल 50 कोटींना खरेदी केला होता. तिचं मुंबईतील 100 कोटी रुपयांचं आलिशान 4 BHK घर, हैदराबाद आणि बंगळुरूमधील बहुमूल्य मालमत्ता तिच्या भव्य जीवनशैलीची साक्ष देतात. तिच्या कार कलेक्शनमध्ये BMW 5 सिरीजपासून मर्सिडीज GLS 350D पर्यंत अनेक लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.
2003 मध्ये ‘मनसिनक्करे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणाऱ्या नयनताराने त्यानंतर तमिळ, तेलुगू, कन्नड चित्रपटांतही यशाची शिडी चढली. ‘श्री राम राज्यम’मधील सीतेच्या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय आणि प्रादेशिक पुरस्कारही मिळाले. तिचं करिअर जितकं यशस्वी, तितकंच ते आत्मविश्वासाने भरलेलं आहे.
‘जवान’मधून बॉलीवूड एंट्री
2023 मध्ये शाहरुख खानसोबत आलेल्या ‘जवान’ या चित्रपटाने 1,100 कोटींहून अधिक कमाई केली आणि ती पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 यादीत स्थान मिळवणारी ती दक्षिणेकडील एकमेव अभिनेत्री ठरली आहे.
2022 मध्ये तिने दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत लग्न केलं आणि सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. तिचं कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य आजही प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय असतो. एकीकडे आई म्हणून जबाबदारी पार पाडणारी आणि दुसरीकडे स्टारडम टिकवणारी नयनतारा ही आधुनिक भारतीय स्त्रीची एक आदर्श प्रतिमा आहे.
तिला ट्रोलिंगही झेलावं लागलं विशेषतः तिच्या शरीरयष्टीसाठी. ‘गजनी’ चित्रपटाच्या वेळी वजनावरून तिची थट्टा करण्यात आली, ‘बिल्ला’मधील बिकिनी सीनवरून टीका झाली, पण नयनताराने कधीच डगमगून न जाता, आपल्या निर्णयांचं खंबीर समर्थन केलं.