आजच्या धकाधकीच्या जगात बहुतेक लोक शहरांकडे धाव घेतात, संधीच्या शोधात. पण या स्पर्धेमुळे काही गावं आणि बेटं मात्र अगदी रिकामी होत चालली आहेत. ही शांत, निसर्गरम्य ठिकाणं आता ओस पडू लागली आहेत आणि सरकारला एकच चिंता आहे, ही ठिकाणं जीवंत कशी ठेवता येतील. त्यामुळे काही देशांनी अशा मोकळ्या जागा पुन्हा जिवंत करण्यासाठी एक भन्नाट योजना आणली आहे. ती म्हणजे तुम्ही जर तिथं येऊन स्थायिक झाला, तर सरकार तुम्हाला लाखो रुपये आणि कधी कधी मोफत घरसुद्धा देईल.

अल्बिनेन गाव
स्वित्झर्लंडमधील अल्बिनेन नावाचं गाव, जसं स्वप्नातल्या एखाद्या चित्रासारखं दिसतं, पण इथे एक मोठी अडचण आहे, लोकच नाहीत. या सुंदर डोंगराळ गावात सध्या फारच थोडे लोक राहतात. त्यामुळे स्विस सरकारने ठरवलं की, जो कुणी इथे राहायला यायला तयार होईल, त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जाईल. उदाहरणच द्यायचं झालं तर, जर चार जणांचं कुटुंब इथे स्थायिक झालं, तर त्यांना एकूण सुमारे 50 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. अर्थात, अट ही आहे की तुम्ही किमान 10 वर्षं इथेच राहिलं पाहिजे आणि तुमचा व्यवसायही इथेच सुरू केला पाहिजे.
प्रेसिचे शहर
आता इटलीकडे वळूया. इथलं प्रेसिचे नावाचं शहर, जे अनेक ऐतिहासिक वास्तू आणि नयनरम्य रस्त्यांनी भरलेलं आहे, पण सध्या इथंही रिकाम्या घरांची रांग लागली आहे. इटली सरकारनेही असाच निर्णय घेतला की, जे लोक येथे स्थायिक होण्यास तयार असतील, त्यांना थेट $30,000 म्हणजेच सुमारे 25 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. तुमचं घर, तुमचं आयुष्य इथे नव्यानं सुरू करायची एक उत्तम संधी आहे.
अँटिकिथेरा बेट
ग्रीसचं अँटिकिथेरा बेट तर या योजनेत अजूनच खास आहे. हे बेट अगदी रम्य, शांत आणि निसर्गाने भरलेलं आहे. पण लोकसंख्या खूपच कमी आहे. म्हणूनच, जर एखादं कुटुंब इथे राहायला आलं, तर त्यांना दरमहा $600 म्हणजे सुमारे 50,000 रुपयांची नियमित आर्थिक मदत दिली जाईल. मासेमारी, शेती अशा पारंपरिक कामांमध्ये गुंतलेल्या कुटुंबांना येथे विशेष प्राधान्य दिलं जातं.
हे सगळं ऐकून स्वप्नवत वाटतं ना? पण ही योजना केवळ पैसे देण्यासाठी नाही, तर हरवत चाललेल्या गावांना, बेटांना, त्यांच्या संस्कृतीला आणि मूळ स्वरूपाला वाचवण्यासाठी आहे. जिथे लोकांनी घरं सोडून दिली, तिथं नवे स्वप्न उभं करण्याची ही सुवर्णसंधी आहे.