जगात आजही काही अशा जमाती आहेत, ज्यांच्या परंपरा आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात. मृत्यूनंतरचे दुःख, आठवणी आणि विरह प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो. पण इंडोनेशियामधील तोराज जमात आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर जी परंपरा पाळते, ती ऐकून कोणाच्याही काळजाचं पाणी पाणी होईल. कारण ते मृतांना ‘मृत’ मानतच नाहीत ते त्यांच्यासोबतच जगतात.
तोराज जमातमधील रिवाज

तोराज जमात दक्षिण सुलावेसीच्या डोंगराळ भागात राहते. या जमातीमध्ये मृत्यूला शेवट मानत नाहीत. ते मृत व्यक्तीला ‘आजारी’ समजतात, आणि त्या आजारी व्यक्तीची पूर्ण काळजी घेतात जणू काही ती अजूनही जिवंत आहे. मृत्यू झाल्यानंतरही त्या व्यक्तीला दफन केलं जात नाही. त्याऐवजी, मृतदेह त्यांच्या घरात ठेवला जातो, त्याला रोज आंघोळ घालण्यात येते, त्याला स्वच्छ आणि नवीन कपडे घालण्यात येतात, त्याच्याशी बोललं जातं, आणि कधी कधी त्याच्यासाठी जेवणसुद्धा वाढण्यात येतं.
या परंपरेमागे तोराज लोकांचा असा विश्वास आहे की प्रत्येक गोष्टीत आत्मा असतो मग ती व्यक्ती जिवंत असो वा मृत. त्यामुळे मृत व्यक्तीला तातडीने दफन करणं ही क्रूरता मानली जाते. त्याऐवजी, त्या व्यक्तीला राज घराण्याप्रमाणे सन्मान दिला जातो आणि त्याचं शरीर काळजीपूर्वक जपलं जातं. विशेष पेस्ट्स लावून मृतदेह सडण्यापासून वाचवला जातो. काही वेळा हे शरीर महिन्यांच्या पुढे, अगदी वर्षानुवर्षं तसंच ठेवलं जातं.
अशा काळजीपोटी, अंत्यविधीसाठी लागणारा खर्चसुद्धा संपूर्ण गावकडून किंवा कुटुंबीयांकडून हळूहळू गोळा केला जातो. जेव्हा सर्व तयारी पूर्ण होते, तेव्हा हा अंत्यविधी एक सोहळा बनतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर डुक्कर आणि म्हशींची बली दिली जाते, आणि त्याचे मांस संपूर्ण समाजाला जेवण म्हणून दिलं जातं. नातेवाईक, शेजारी आणि गावकऱ्यांची उपस्थिती असलेल्या या सोहळ्याला एक सामाजिक समारंभ मानलंला जातो.
विशेष विधी
अखेरीस, मृतदेह डोंगरातील गुहांमध्ये किंवा झाडांच्या आत दफन केला जातो. पण इतक्यावरच ही परंपरा थांबत नाही. दरवर्षी, येथे एक विशेष विधी साजरा केला जातो. या दिवशी मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याला स्वच्छ केलं जातं, त्याला नवीन कपडे घालवले जातात आणि तो संपूर्ण गावातून मिरवणुकीने फिरवला जातो, जणू त्या व्यक्तीचा आत्मा अजूनही आपल्या प्रियजनांमध्ये आहे.
हे ऐकताना आपण थरकापून जाऊ शकतो. पण ही परंपरा केवळ विचित्र नाही, ती मृत्यूला एका विलक्षण, भावनिक आणि मानवी नात्यांनी व्यापलेल्या नजरेने पाहणारी संस्कृती दर्शवते. तोराज जमात मृत्यूवर शोक करत नाही, ते मृतांनाही आयुष्याचा एक भाग मानतात.