कपाळ म्हणजे चेहऱ्याचा तो भाग, जिथून एखाद्या व्यक्तीच्या विचारांची, नियतीची आणि व्यक्तिमत्त्वाची अनेक संकेत मिळू शकतात. एखाद्याचं कपाळ पाहून त्याच्या स्वभावाबद्दल अंदाज बांधता येतो, असं म्हणणं केवळ गप्पाटप्पा नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या सामुद्रिक शास्त्राने मान्य केलेला एक विचार आहे. भारतीय संस्कृतीत तर कपाळाला एक पवित्र आणि आध्यात्मिक स्थान दिलं गेलं आहे, अगदी तिथे चंद्रकोर किंवा कुंकवाचा टिळा लावण्यामागेही काही कारणं आहेत.

आपण सर्वजण स्वभावाने, विचारांनी, आणि चेहऱ्यानेही वेगळे आहोत. पण सामुद्रिक शास्त्र सांगतं की प्रत्येक शरीररचनेमागे एक सूक्ष्म संकेत असतो. आपले हात, पाय, डोळे, ओठ सगळ्याच अंगांची रचना आपल्या अंतर्मनाशी जोडलेली आहे. पण यामध्ये विशेष लक्षात येतो तो म्हणजे कपाळ. कारण कपाळाच्या आकारातून व्यक्तीची बुध्दी, भाग्य आणि आयुष्यातील प्रवास कसा असेल याचा अनेकदा अंदाज घेतला जातो.
कपाळावरून कसं ओळखाल व्यक्तीमत्व?
जर एखाद्याचं कपाळ मोठं, विस्तीर्ण आणि उंच असेल, तर अशा व्यक्तीला जीवनात यशाचं बळ लाभतं, असं मानलं जातं. या व्यक्ती अतिशय संयमी, शांत, आणि विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या असतात. त्यांच्या मनात कायम काही ना काही ठाम ध्येय असतं आणि त्या ध्येयासाठी ते मेहनत करण्यास तयार असतात. त्यांचं नेतृत्वगुण खूप ताकदीचं असतं आणि इतरांनाही त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून प्रेरणा मिळत असते.
याउलट, लहान कपाळ असलेल्या व्यक्ती उत्साही आणि जलद निर्णय घेणाऱ्या असतात. काही वेळा त्या अतिशय भावनिक किंवा धिटाईने वागतात. पण त्यांच्या आत एक जबरदस्त उर्जा असते, जी त्यांना प्रत्येक संकटावर मात करू देते. त्यांच्या आयुष्यात संघर्ष खूप असतो, पण त्यांनी एकदा यशाच्या वाटेवर पाऊल टाकलं की मग ते थेट शिखर गाठतात.
काही लोकांचं कपाळ किंचित पुढे झुकलेलं असतं. अशा व्यक्ती धार्मिक वृत्तीच्या, भावनिक आणि सामाजिक जाणिवा असलेल्या असतात. ते इतरांच्या दुःखात सहभागी होतात, अन्याय पाहू शकत नाहीत आणि त्यांच्या मनात सदैव एक आध्यात्मिक ओढ असते. त्यांचा आत्मविश्वासही उल्लेखनीय असतो.
अशा प्रकारे, कपाळ हे फक्त चेहऱ्याचा भाग नसून, ते आपल्या अंतर्मनाचा आरसा असू शकतं. आपलं व्यक्तिमत्त्व, आपल्या स्वप्नांचा प्रवास, आपल्या स्वभावाची दिशा या सर्व गोष्टींचं प्रतिबिंब आपल्या कपाळात उमटलेलं असतं, हे सामुद्रिक शास्त्र आपल्याला सांगतं.