मोबाईल फोनचा वापर आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अत्यावश्यक भाग झाला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण या छोट्याशा गॅजेटवर अवलंबून आहोत. मग ते काम असो, संवाद असो, किंवा विरंगुळ्याचा वेळ असो. पण या रोजच्या वापरामध्ये एक फीचर असं आहे, ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो ते म्हणजे एअरप्लेन मोड. याचा उपयोग केवळ विमानात बसल्यावरच होतो, असं आपल्याला वाटतं, पण खरं सांगायचं तर यामागचं वास्तव थोडं वेगळं आहे.

एअरप्लेन मोड हा एक असा फिचर आहे जो केवळ फ्लाइटमध्येच उपयुक्त नाही, तर आपल्या दैनंदिन आयुष्यातही त्याचे फायदे मोठे आहेत. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, जेव्हा फोनचा नेटवर्क खूपच कमी असतो किंवा फोन जास्त वेळ चार्जिंगला लावावा लागतो, तेव्हा तो लवकर चार्ज होत नाही? त्यावेळी एअरप्लेन मोड खूप उपयोगी ठरतो. यामध्ये नेटवर्क, वायफाय, ब्लूटूथ अशा सगळ्या गोष्टी बंद होतात आणि त्यामुळे फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेली अतिरिक्त कामं थांबतात. परिणामी, फोन जलद चार्ज होतो.
एअरप्लेन मोडचे फायदे
एअरप्लेन मोडचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे बॅटरी वाचवणं. जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे नेटवर्क सतत जातं आणि येतं, तर फोन वारंवार सिग्नल शोधतो आणि यामुळे बॅटरी झपाट्याने कमी होते. अशा वेळी एअरप्लेन मोड सुरू केल्यास फोन ते शोधणं थांबवतो, आणि बॅटरी जास्त काळ टिकते.
तिसरं म्हणजे, फोनचा ओव्हरहिट होण्याचा त्रास. जर तुम्ही गेम्स खेळत असाल, किंवा सतत इंटरनेट वापरत असाल, तर फोनचा प्रोसेसर थकतो आणि तो तापतो. एअरप्लेन मोडमुळे फोन काही काळ ‘विश्रांती’ घेतो. त्यामुळे त्याचे तापमान नियंत्रित राहते आणि तुमच्या डिव्हाईसचं आयुष्यही वाढतं.
आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपैकी मोबाईल एक मोठा घटक बनला आहे. काम करताना येणाऱ्या सततच्या नोटिफिकेशन्समुळे लक्ष भंग होतं. अशावेळी एअरप्लेन मोड हा फोकस राखण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय ठरतो. एकदा का तो सुरू केला की, कॉल्स आणि मेसेजेस थांबतात आणि तुम्ही पूर्णपणे तुमच्या कामात एकाग्र होऊ शकता.
शेवटी, आपल्या मुलांचा विचार केला तर आजकाल त्यांना मोबाईलचा नाद लागलेला असतो. गेम्स, यूट्यूब, सोशल मीडिया सगळं त्यांच्या बोटांवर आहे. पण जर तुम्हाला त्यांना काही काळ इंटरनेटपासून दूर ठेवायचं असेल, तर एअरप्लेन मोड यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो.