विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस, ११ जागांसाठी लढणार १४ उमेदवार ?

Ahmednagarlive24 office
Published:
vidhan parishad

लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषदेचे देखील बिगुल वाजले आहे, यासाठी विधानसभा सदस्यांतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या ११ सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. तर या जाहीर झालेल्या ११ जागांकरता एकूण १४ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरही ११ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्यास विधानपरिषदेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

१२ जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपने ५ उमेदवार नक्की केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी २ उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येकी १ उमेदवार नक्की केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. शिवाय, दोन अपक्ष उमेदवारांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे, हे सर्व अर्ज कायम राहिल्यास विधान परिषद निवडणुकीत मतांसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता २८८ पैकी १४ जागा राजीनामा किंवा सदस्यांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत

त्यामुळे निवडणुकीसाठी २७४ मतदार असून पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा कमी झाला आहे. विजयाकरता उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या २३ मतांची गरज भासेल. सध्या विधानसभेत भाजपचे १०३ सदस्य असून, अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपचे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिवसेनेकडे

स्वतःचे ४० तर १० अपक्ष मतदार आहेत. त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४३ आमदारांचे पाठबळ असल्याने त्यांचे दोन उमेदवार निवडून येण्याएवढे संख्याबळ कागदावर आहे. ३६ आमदार असलेल्या काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.

शिवाय, त्यांच्याकडे अतिरिक्त मते शिल्लक राहतात. त्यामुळे, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे दोन पक्ष एकत्र आल्यास त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

काँग्रेसकडील अतिरिक्त मतांच्या आधारे महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याची खेळी खेळली जात आहे. त्यामुळे, शिवसेनेने (ठाकरे) मिलिंद नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार व त्यांचे पक्ष

भाजप पंकजा मुंडे, अमित गोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील (शेकाप)

राष्ट्रवादी काँग्रेस शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर शिवसेना कृपाल तुमाने, भावना गवळी

काँग्रेस प्रज्ञा सातव

शिवसेना (ठाकरे) – मिलिंद नार्वेकर

करणी सेना – अजय सेंगर अपक्ष उमेदवार – अरुण जगताप

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe