राहुरी तालुक्यात ४३ महिला होणार सरपंच, ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षण जाहीर

Published on -

राहुरी तालुक्यातील एकूण ८३ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. २५ एप्रिल रोजी राहुरी पंचायत समितीच्या कार्यालयात उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार संध्या दळवी, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे आणि गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. यावेळी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणाचा कालावधी सन २०३० पर्यंत लागू राहणार आहे.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर संबंधित गावांमध्ये आगामी निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला असून स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. ही आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्याचे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

ग्रामीण महिला नेतृत्वाच्या दिशेने पुढचे पाऊल

महिलांसाठी आरक्षित ४३ सरपंच पदांमुळे राहुरी तालुक्यात महिलांच्या राजकीय सहभागाला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्याने त्यांच्या सामाजिक आणि प्रशासनिक सक्षमीकरणास मदत होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढल्यास विकास प्रक्रियेत नवे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे.

खुडसरगाव, चिकलठाण आणि मोकळ ओहोळ या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार असून या तीन गावांसाठी महिला आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय आंबी, तांदुळनेर, गणेगाव, मल्हारवाडी, जांभळी (अनु. जाती महिला), कोंढवड, खडांबे बु., दवणगाव, सात्रळ, निभेरे, तुळापूर, तांभेरे, गुंजाळे (अनु. जमाती महिला), बारागाव नांदूर, कुक्कडवेढे, उंबरे, वांबोरी, कात्रड, वळण, संक्रापूर, बोधेगाव, केंदळ खुर्द, खडांबे खुर्द (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), तांदुळवाडी, तिळापुर, रामपूर, चेडगाव, कोपरे, घोरपडवाडी, लाख, केंदळ बु., पिंपळगाव फुणगी, चिचविहिरे, कोळेवाडी, करजगाव, कनगर खुर्द, पिंप्री वळण, ताहाराबाद, धानोरे, चांदेगाव (सर्वसाधारण महिला) या ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे महिला आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News