Grampanchayat Elections : राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी रविवारी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होत आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मागील महिन्यात निवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडले.
किरकोळ घटना वगळता राज्यभर शांततेत मतदान झाले. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी १३ या वेळेत मतदान घेण्यात आले.
नक्षलग्रस्त भागात मतदान शांततेत पार पडल्यानंतर मतदान केंद्रावरून ईव्हीएम पेट्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
अजित पवार मतदानाला गैरहजर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. मात्र डेंग्यू झाल्याने मुंबईत विश्रांती घेत असलेले अजितदादा मतदानाला गैरहजर राहिले. परंतु त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आई आशाताई पवार यांनी मतदान बजावले.
■ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरातील बावडा येथे कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक बडे नेते, मंत्री, खासदार- आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.