१२ फेब्रुवारी २०२५ अकोले : अकोले तालुक्याला रेल्वेच्या नकाशावर स्थान मिळावे, यासाठी शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ. लहामटे यांनी सांगितले.
अकोले तालुक्याला रेल्वेने जोडण्यासाठी शहापूर (ठाणे) – डोळखांब भंडारदरा अकोले संगमनेर शिर्डी – साईनगर असा रेल्वे मार्ग व्हावा, अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. राज्यातील नवीन रेल्वे मार्गांपैकी निम्मा खर्च राज्य शासन करत असल्याने, हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविणे आवश्यक आहे.आ. डॉ. लहामटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने रेल्वेकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-2025-02-12T120918.826.jpg)
भंडारदरा धरण, सांदणदरी, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड आदी गड-किल्ले आणि पुरातन मंदिरांपर्यंत मुंबई व ठाणे परिसरातील पर्यटक सहज पोहोचू शकतील.शिर्डीला येणाऱ्या भाविकांना देखील या भागात फिरण्याची संधी मिळेल, परिणामी पर्यटन व्यवसायात मोठी वाढ होईल.व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी देखील हा मार्ग फायदेशीर ठरणार असून, त्यांना एकाच दिवसात मुंबईला जाऊन परतणे शक्य होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल करू नये, अशी मागणीही आमदार लहामटे यांनी केली आहे.मूळ आराखड्यात अकोल्यातील देवठाण येथे रेल्वे स्थानक होते, मात्र बदललेल्या आराखड्यात त्याचा समावेश नाही. हे स्थानक पूर्ववत ठेवावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेल्वे आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून, या विषयावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
रेल्वे आल्यास काय होईल ?
मध्य रेल्वेवरील आसनगाव (शहापूर) ते साईनगर शिर्डी हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्यास अकोले तालुका थेट मुंबईशी जोडला जाईल.त्यामुळे अकोले तालुक्यातील भाजीपाला, फळे, दूध मुंबईच्या बाजारपेठेत सहज पोहोचू शकतील.यामुळे शेती व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे.
आदिवासी भागाच्या विकासाला मिळेल गती
हा प्रस्तावित रेल्वे मार्ग आदिवासी भागातून जाणार असल्याने या भागाच्या विकासासाठी तो महत्त्वाचा ठरेल. मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात, या रेल्वे मार्गाचे महत्त्व आणि गरज आमदार लहामटे यांनी स्पष्ट केली आहे. तसेच, हा मार्ग कसारा घाटाला पर्यायी मार्ग म्हणूनही उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले आहे.