उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू असून, येत्या 29 जानेवारीला 20-25 आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनीही यास दुजोरा दिला आहे.
ठाकरे गटाला मोठे खिंडार
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे 35 स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात आता अहिल्यानगरमधील मोठ्या संख्येने नगरसेवक व पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. यामुळे ठाकरे गटाची ताकद आणखी खालावणार आहे.
महापालिका निवडणुकांचे रण
एप्रिल-मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीच्या तयारीला वेग आला आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांच्या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश असून, यामुळे शिंदे गटाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पकड आणखी मजबूत होईल, असे दिसते.
प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाणे गाठले…
6 जानेवारी रोजी माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांची घरवापसी झाल्यानंतर, अनेक अन्य नेत्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. यात दत्ता जाधव, दीपक खैरे आणि प्रशांत गायकवाड यांचा समावेश आहे. 18 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाणे गाठले होते. या बैठकीत आगामी प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन दिग्गज नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाला लागोपाठच्या धक्क्यांमुळे पक्षाच्या संघटनेला आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने या प्रवेशांच्या माध्यमातून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश लवकरच होणार असल्याचे संकेत असून, यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटासाठी फायदेशीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.