अहिल्यानगर जिल्ह्यात 7 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ! कोण कुठून लढणार ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत आमने सामने राहणार आहे.

या दोन्ही गटांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट हे तीन पक्ष आहेत तर महायुतीमध्ये भाजप अजित पवार गट आणि शिंदे गट हे तीन पक्ष आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार असून यामुळे यंदाच्या विधानसभेची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार असा विश्वास व्यक्त होत आहे.

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन गटांमध्ये थेट लढत होणार आहे. पण राज्याच्या विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

यामुळे चार तारखेनंतरच अर्थातच उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतरच महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्याच्या विविध मतदार संघांमध्ये कोणा कोणा मध्ये थेट लढत होणार हे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या तारखे नंतरच क्लिअर होणार आहे.

सध्या स्थितीला मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात सात महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील एक महिला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे तर सहा महिला महाविकास आघाडी कडून तसेच महायुतीकडून निवडणूक लढवताना दिसणार आहेत.

दरम्यान आता आपण निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील या सात महिला उमेदवारांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या महिला निवडणुकीच्या रिंगणात
या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना ठाकरे गट अन राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी महिलांना संधी दिली आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात 7 महिला असून यातील 6 महिला अधिकृत पक्षाच्या उमेदवार आहेत.

तर, एक अपक्ष महिला रिंगणात उतरणार आहे. भाजपने दोन महिलांना संधी दिलीये. भाजपाने शेवगाव-पाथर्डीतून विद्यमान आमदार मोनिका राजळे अन श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाने अनुराधा नागवडे यांना उमेदवारी दिली आहे.

नागवडे या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राहिल्या आहेत. तर पारनेरमधून राणी लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यादेखील जिल्हा परिषद सदस्य होत्या.

शिर्डी मतदारसंघात काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. घोगरे या यापूर्वी कोणतीही निवडणूक लढल्या नाहीत. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून हर्षदा काकडे या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

नगर शहर मतदारसंघातून काँग्रेसने बंडखोरी केली असून, मंगला भुजबळ या निवडणुकीसाठी उभ्या आहेत, तर दुसरीकडे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी सुवर्णा कोतकर याही निवडणुकीमध्ये उभ्या आहेत. तथापि चार नोव्हेंबर नंतर म्हणजेच अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतरचं निवडणुकीचे हे चित्र क्लिअर होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe