Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यांमध्ये राजकीयदृष्ट्या वातावरण ढवळून निघत आहे. अनेक मतदारसंघांमधून बंडखोरांना शांत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र भाजपच्या पुढे वेगळाच प्रकारचा तिढा निर्माण झालेला आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली. परंतु त्यानंतर मात्र स्वतः प्रतिभा पाचपुते यांनी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती व त्या संदर्भातली मागणी पक्षाकडे देखील केली होती.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र पक्ष श्रेष्ठींकडून प्रतिभा पाचपुते यांचे नाव निश्चित करण्यात आल्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपाकडून कायम ठेवण्यात आली. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवस बाकी असताना मात्र प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी बाबत एक मोठा निर्णय जाहीर केला असून यामुळे भाजपापुढे एक तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रतिभा पाचपुते हे करणार उमेदवार बदलण्याची मागणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. परंतु त्यानंतर प्रतिभा पाचपुते यांनी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी अशा संदर्भाची मागणी केली होती.
परंतु पक्षाने प्रतिभा पाचपुते यांचे नाव निश्चित केले असल्यामुळे उमेदवार बदलायला पक्षश्रेष्ठींनी नकार दिला. आता उमेदवारी अर्ज मागे घ्यायला एक दिवस बाकी आहे व या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की,पक्षाकडे पुन्हा उमेदवार बदलण्याची मागणी करणार असून पक्षाने जर ऐकले नाही तर सोमवारी अर्ज मागे घेणार असल्याची त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाल्या प्रतिभा पाचपुते?
यासंदर्भात बोलताना प्रतिभा पाचपुते म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षापासून पाचपुते साहेब आजारी असल्यामुळे मुंबईची जी काही कामे आहेत ती सगळी विक्रमसिंह पाहत होता. विक्रम काम पाहायचा आणि साहेब आमदार म्हणून असायचे.
तर मला वाटते तोच काम पाहतो तर तोच आमदार का नाही? जर विक्रम सिंह स्वतः आमदार असेल तर तो यापेक्षा चांगली काम करू शकेल असे मला वाटते. जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा फडणवीस साहेबांना विक्रमला तिकीट द्या असं सांगायला मी गेले होते.
परंतु तेव्हा त्यांनी सांगितले की,आता उमेदवारी फिक्स झाली आहे व त्यामुळे तुम्हीच उभे राहा. त्यानंतर मी प्रचाराला देखील सुरुवात केली. प्रचारासाठी बाहेर राहावं लागायचं व त्यामुळे कळत नकळत पाचपुते साहेबांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं.
त्यामुळे माझं पत्नी म्हणून कर्तव्य आहे की पहिले साहेबांची तब्येत आणि नंतर आमदारकी असं देखील प्रतिभा पाचपुते यांनी म्हटले. 1984 सालापासून बबनराव पाचपुते यांची पत्नी आहे. तेव्हापासून साहेब सलग आमदार आहेत व तेव्हापासून आमदाराची पत्नी आहे. मात्र आता आमदाराची आई व्हायला काय हरकत आहे असं देखील प्रतिभा पाचपुते म्हणाल्या.
जर पक्षाने ऐकले नाही तर…
विक्रम सिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी याकरिता भाजप उमेदवार प्रतिभा पाचपुते आग्रही आहेत व प्रतिभा पाचपुते पक्षाकडे पुन्हा उमेदवार बदलण्याची मागणी करणार आहेत.
परंतु उमेदवार बदलाबाबत जर पक्षाने ऐकले नाही तर सोमवारी स्वतःचा अर्ज मागे घेणार आहेत. यावेळी बबनराव पाचपुते यांच्या तब्येतीचे कारण देत प्रतिभा पाचपुते माघार घेणार आहेत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर भाजप पक्षश्रेष्ठींकडून काय निर्णय घेतला जातो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.