Ahilyanagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्याने आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत सुरू असणाऱ्या चर्चांना वेग आला आहे. अजून दोन्ही गटाकडून उमेदवारांची नावे फायनल झालेली नाहीत मात्र लवकरच महाविकास आघाडी आणि महायुती आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार अशी शक्यता आहे.
अशातच अहिल्या नगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील अहिल्या नगर जिल्ह्याच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी स्वतः ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी घोषणा केली आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण आगामी काळात आणखी तापणार असे दिसते. जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत.
दोन लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या या 12 विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून गत काही दिवसांपासून तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुकांनी गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे.
दिलीप खेडकर यांनी, ‘लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापितांना त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असल्याच वाटत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मला व माझ्या कुटूंबीयाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला.
त्यामुळे मला जरी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी मी विधानसभेची निवडणूक लढवणार,’ अशी मोठी घोषणा केली आहे. एवढेच नाही तर दिलीप खेडकर यांनी ते भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे.
तसेच जर बीजेपी ने आपल्याला उमेदवारी दिली नाही तर इतर पक्षाकडूनही मला ऑफर आहे असा दावा यावेळी खेडकर यांनी केला आहे. यामुळे दिलीप खेडकर हे विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार ? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान जर भारतीय जनता पक्षाने माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांना शेवगाव पाथर्डी मधून उमेदवारी दिली तर विरोधकांना त्यांच्यावर हल्ला चढवण्यासाठी आयते कोलीत मिळणार असे भासत आहे.