Ahilyanagar News :निळवंडे कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात वादाचा कोणताही विषय नाही. लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे. त्याबाबतीत वेळापत्रक तयार करणे, ते योग्यरीत्या पाळले जाईल याचा विश्वास लोकांना देणे, ही भूमिका पाटबंधारे विभागाने घ्यायला हवी. हा विषय राहुरी किंवा राहत्याला जाणाऱ्या पाण्याच्या बाबतीत नाही, ज्याचा हक्क आहे त्याला पाणी मिळालेच पाहिजे, यामध्ये पाटबंधारे विभागाचा संवाद कुठेतरी कमी पडतो आहे,म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घ्या चर्चेतून मार्ग निघेल असे मत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्याच्या त्याच्या हक्काचे पाणी ज्याचे त्याला मिळाले पाहिजे याबाबतीत कोणतीही शंका नाही. मात्र याबाबतीत कुठेतरी फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे संगमनेर तालुक्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आपल्याला फसवले जात आहे, ही भावना वाढल्यामुळे शेतकरी पाईप टाकून पाणी घेत आहे. अशावेळी त्यांच्याशी चर्चा करायला हवी, चर्चा करून हा प्रश्न मिटविला पाहिजे आणि त्यांना विश्वास दिला पाहिजे की तुमच्या हक्काचे पाणी तुम्हाला मिळेल. मात्र असे होताना दिसत नाही, याउलट शेतकऱ्यांचे पाईप फोडले जात आहे. त्यांचे नुकसान केले जात आहे. म्हणून लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहे.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, सरळ वागून व सहकार्य करूनही आपल्याला हक्काचे पाणी मिळत नाही, म्हणून जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला व त्यातून त्यांच्या भावना तीव्र झाल्या असे माझे स्पष्ट मत आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा झालेला संताप जलसंपदा विभागाने समजून घ्यायला हवा, या अगोदर दोन वेळा प्रशासनाने शेतकऱ्यांना शब्द दिला मात्र त्याचे पालन केले नाही. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. हा वाद राहुरी, राहाता आणि संगमनेर असा नाही, कोणीही त्याला तसे स्वरूप देण्याचा प्रयत्न करू नये. राहुरी तालुक्यातील लोकही आपलेच आहे. त्यांनाही पाणी मिळाले पाहिजे .मात्र त्याच बरोबर, संगमनेर तालुक्यावर ही अन्याय होता कामा नये.
बाळासाहेब थोरात म्हणाले, निळवंडे धरण आणि कालव्यांची निर्मिती करताना त्याच्यामध्ये लाभ क्षेत्रातील सर्व गावांना पाणी मिळेल याचा विचार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पाण्यावर लाभ क्षेत्रातील सर्वांचा अधिकार आहे. राहुरी, राहाता तालुक्यातही आपलेच लोक राहतात. या पाण्यावर त्यांचाही हक्क आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे या अगोदरच्या भूमिकेमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे.
प्रशासनाने या संदर्भात गावागावात बैठका घेऊन त्यांना कागदावर नियोजन समजावून सांगणे आवश्यक आहे, असे न करता शेतकऱ्यांनी टाकलेले पाईप फोडणे किंवा पाईप उपसून फेकणे हे चुकीचे आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाने चर्चा केली असती तर मार्ग निघू शकला असता. कोणतीही चर्चा न करता जलसंपदा विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी जेव्हा थेट कालव्यांवर जाऊन शेतकऱ्यांनी टाकलेले पाईप उपसून फेकत आहेत किंवा फोडून टाकत आहे, तेव्हा शेतकरी संताप व्यक्त करणे सहाजिक आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ज्याच्या त्याच्या हक्काचे पाणी त्यांना मिळेल हा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.