Ahilyanagar News : पारनेर तालुका केवळ ग्रामीण कुस्ती परंपरेसाठीच नव्हे, तर आता राजकीय कुस्त्यांसाठीही चर्चेचा विषय ठरतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोरेगाव येथील अंबिका माता यात्रेच्या कुस्ती महोत्सवात हे प्रकर्षाने दिसून आलं. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून स्पष्ट केलं की, त्यांच्या कुटुंबाचा आणि पारनेर तालुक्याचा संबंध हा परस्पर प्रेमाचा आहे. “तालुक्याच्या जनतेच्या प्रेमामुळे मला वारंवार इथे यावं लागतं,” असे सांगून त्यांनी उपस्थितांमध्ये आपुलकी निर्माण केली.
भव्य आखाडा
गोरेगाव येथे माजी सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्रभरातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिकसह हरियाणामधून आलेल्या सुमारे ४०० मल्लांनी विविध लढतींमध्ये भाग घेतला. सकाळपासून सुरू झालेला हा कुस्ती महोत्सव रात्री उशिरा पर्यंत रंगत गेला. प्रत्येक कुस्ती ही चित्तथरारक ठरत होती.

राजकीय उपस्थिती
या मैदानात डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह आमदार काशिनाथ दाते, माजी सभापती बाबासाहेब तांबे, माजी जि.प. उपाध्यक्ष सुजित झावरे, मुळा कारखान्याचे संचालक बापूसाहेब शेटे यांच्यासारख्या राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती लाभली. डॉ. विखे यांनी मैदानातील शिस्तबद्धता, नियोजन आणि उर्जा यांचे विशेष कौतुक केले. तर आमदार दाते यांनी पारनेरमध्ये अशा भव्य आखाड्यांचे आयोजन ही परंपरा म्हणून पुढे नेण्याची गरज असल्याचे मत मांडले.
शेवटची कुस्ती
या मैदानातील सर्वात मोठा क्षण ठरली ती माउली जमदाडे आणि हरियाणाच्या सोनू कुमार यांच्यात झालेली अंतिम कुस्ती. २ लाख ११ हजार रुपयांच्या पारितोषिकासाठी झालेल्या या कुस्तीत माउली जमदाडे यांनी चित्तथरारक विजय मिळवला. मैदानात जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी या कुस्तीला मोठा प्रतिसाद दिला.
मल्लांची दमदार कामगिरी
या मैदानात देशभरातून आलेल्या अनेक मल्लांनी आपली कुशलता सिध्द केली. माउली जमदाडे, सोनू कुमार (हरियाणा), चेतन रेपाळे, अक्षय कावरे, अनिकेत मांगडे, सागर देवकाते, कुमार देशमाने, तेजस उलागड्डी, प्रकाश कार्ले अशा नवोदित व अनुभवी मल्लांनी कुस्तीप्रेमींची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या यशामागे अनेकांचे योगदान होते. कुस्ती आखाड्याचे मुख्य संयोजक माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या नेतृत्वात सुरेश गडाख, एस. बी. शेटे, विश्वनाथ कोरडे, मुबारक शेख, शुभम पाटील, शंकरराव नगरे, विकास रोहोकले यांसारख्या अनेकांनी मैदानाची आखणी केली. या सर्वांच्या एकत्र प्रयत्नामुळे कुस्ती महोत्सव केवळ खेळापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो सामाजिक सलोख्याचा उत्सव ठरला.