भाजप हा देशातील आणि राज्यातील मोठा पक्ष झालाय. दरम्यान आता पक्षाने आपल्या पॅटर्नमध्येही बदल केलाय. भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक तालुक्यात तीन मंडल अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपने घेतला आहे. येत्या दोन दिवसांत तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर होणार असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहिल्यानगर दक्षिणमध्ये २२ मंडल अध्यक्षांच्या निवडी होणार असून प्रत्येक तालुक्याला तीन तालुका अध्यक्ष मिळणार आहेत.

दोन गटांत एक तालुका अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या निवडीमुळे पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी भाजपला याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के यांनी सांगितले. दरम्यान, भाजप पक्षांतर्गत तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी होणार आहेत.
या निवडीसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ते स्थानिक आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी, सदस्य यांच्याशी चर्चा करून पक्ष वाढीसाठी योगदान असणाऱ्या सक्रीय सदस्यांची पदावर वर्णी लावणार आहेत. येत्या दोन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर होणार आहेत.
भाजपच्या संघटनपर्व सदस्य नोंदणी अभियानांतर्गत नगर जिल्ह्यातील उत्तर नगर, दक्षिण नगर व नगर शहर महानगर जिल्हाध्यक्ष अशा तीनही पदाधिकाऱ्यांच्या निवडी १५ ते २५ एप्रिल दरम्यान होणार आहेत.
प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी व विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत जिल्हा भाजपच्या संघटन पर्व सदस्यनोंदणी अभियानाचा आढावा नगरमध्ये घेण्यात आला. यावेळी नगर शहर व परिसरातील नगर शहर, मध्य नगर शहर, भिंगार व केडगाव या चारही मंडलांची पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कर्डिलेंना लॉटरी ?
दरम्यान या निवडीमध्ये अक्षय शिवाजीराव कर्डीले यांना मोठी संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे त्यांची नवी राजकीय इंनिंग सुरु होईल असं म्हटलं जात आहे.