सध्या माजीमंत्री थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी एन.सी.डी.सी. अंतर्गत मार्जिन मनी लोन ७४ कोटी रुपये मंजूर झाले. हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे.
या बद्दल माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात श्री गणेश कारखाना संचालक मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेत आभार मानले. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

श्री गणेश कारखाना हा हजारो कुटुंबांना आधार असलेली कामधेनू म्हणून ओळखला जातो. सलग दुसरा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यात कारखान्याला यश आले आहे. काळाच्या दृष्टीने स्पर्धात्मक वातावरणात नवनवीन बदल करणे आवश्यक असून
त्या दृष्टीने एनसीडीसी अंतर्गत मिळणारे ७४ कोटी रुपयांचे कर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांतून मंजूर झाले आहे. यापुढील काळात देखील कारखान्याच्या विकासात्मक दृष्टीने सहकार्य राहील असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
कोल्हेंचे ‘अच्छे दिन’ सुरु
कोल्हे कुटुंबीय विधानसभेसाठी इच्छुक होते. परंतु मुख्यमंत्री फडणवीसांच्या शब्दानुसार त्यांनी विखे-काळे अर्थात महायुतीला मदत केली. आता त्याचे चांगले फळ त्यांना मिळण्यास सुरवात झाल्याचे बोलले जाताही. कारखान्यास मंजूर झालेले कर्ज ही तर सुरवात आहे, आणखी पुढे बरेच फायदे कोल्हे यांना मिळतील अशी चर्चा आहे.
पहिल्या पाचमध्ये गणेश कारखाना असेल
शेतकरी, सभासद,कर्मचारी यांच्या उन्नतीसाठी या मदतीचा मोठा लाभ होणार असून भविष्यात गणेश कारखाना हा अधिक सक्षमपणे पाऊल टाकेल. प्रयत्न आणि हेतू प्रामाणिक असेल तर निश्चित सकारात्मक गोष्टी घडतात या भावनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सहकार्य हे मोलाचे आहे. आगामी काळात जिल्ह्यातील पहिल्या पाच मध्ये श्री गणेश कारखाना येण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे कारखान्याचे मार्गदर्शक विवेक कोल्हे म्हणाले.