Ahilyanagar Politics News : नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे विधानसभा विसर्जित होणार आहे. दरम्यान विधानसभा विसर्जित होण्याआधीच महाराष्ट्रात नवीन सरकार येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार असे जाहीर केले आहे.
20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी अर्थातच 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने आता महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागा वाटपावर जोरदार खलबत सुरू झाले आहे.
बहुतांशी जागांवर दोन्ही गटांमध्ये सहमती बनली आहे मात्र अजून अशा काही जागा आहेत ज्यावर दोन्ही गटांमध्ये सहमती नाही. नगर शहर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून महायुतीकडून अजित पवार गटाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
ही जागा महायुतीकडून अजित पवार गटाला सुटेल आणि येथून अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना उमेदवारी जाहीर होईल हे जवळपास निश्चित असल्याचे समजते. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत अजून काहीही ठरलेले नसल्याचे वास्तव आहे.
मात्र आघाडी मधील तिन्ही पक्ष या जागेसाठी इच्छुक आहेत हे तेवढेच खरे. काँग्रेस मधून या जागेसाठी केवळ एक जण इच्छुक आहे, परंतु शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात इच्छुकांची मोठ्या प्रमाणात भाऊ गर्दी आहे. हेच कारण आहे की अजून महाविकास आघाडीचा या जागेसाठीचा गुंता पूर्णपणे सुटलेला नसल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे एकमात्र उमेदवार उत्सुक आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर, डॉ. अनिल आठरे, शौकत तांबोळी यांच्या नावाची चर्चा आहे. पण ही जागा शरद पवार गटाला सुटली तर येथून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे मत राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
तसेच शिवसेना उबाठाकडून जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे हे इच्छुक आहेत. यातील गाडे यांचे नाव सर्वात जास्त चर्चेस आहे. यामुळे महाविकास आघाडी कडून ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार आणि येथून कोणाला संधी मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
खरे तर महायुतीमध्ये देखील भारतीय जनता पक्षातील काहीजण या जागेसाठी इच्छुक होते. पण, महायुतीने सीटिंग गेटिंग हा फॉर्मुला आणलाय, अर्थातच विद्यमान आमदारांच्या पक्षालाचं ती जागा मिळणार आहे. यामुळे ही जागा अजित पवार गटाकडेचं राहणार हे फायनल झाले आहे.
कोतकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
यंदा माजी महापौर संदीप कोतकर यांनी देखील विधानसभा लढवण्याचा निर्धार केला आहे. मात्र त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. ठाकरे गटाकडून तसेच शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी कोतकर गट सक्रिय आहे.
कोतकर गटाकडून या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे, जर या पक्षांकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. संदीप कोतकर हे आमदार संग्राम भैया जगताप यांचे साडू आहेत. यामुळे जर कोतकर विधानसभा निवडणुकीत उतरले तर साडू-साडू मध्ये ही लढत रंगण्याची शक्यता आहे.