आ. प्रा. राम शिंदे हे विधानपरिषदेवर सभापती झाले आणि त्यांनी राजकीय ताकद वाढली. त्यानंतर त्यांनी आता राजकीय अस्तित्व प्रबळ करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी आ. रोहित पवार यांच्या अस्तित्वालाच आता धक्के देण्यास सुरवात केलीये.
कर्जतमधील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेण्यात अखेर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना यश आले आहे. तेरा नगरसेवक त्यांच्यासोबत गेले असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी आ. रोहित पवार गटाच्या कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

आ. रोहित पवार आणि भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. पूर्वी भाजपच्या ताब्यात असलेली ही नगरपंचायत आ. पवार आणि राऊत यांनी हिसकावत आपली सत्ता आणली होती. या नगरपंचायतची अजून दोन वर्षे मुदत आहे. आता अविश्वास ठराव दाखल झाल्याने आ. पवार यांचे नगरपंचायतवरील वर्चस्वाला आव्हान मिळाले आहे.
कर्जत नगरपंचायतमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ आणि काँग्रेसचे तीन नगरसेवकानी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासोबत रविवार रात्री गोपनीय बैठक घेतली होती. सोमवारी लगेच हा ठराव देण्यात आला.
अविश्वास ठराव आलेल्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत या नामदेव राऊत यांच्या स्नुषा आहेत. तेरा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर आमचा विश्वास राहिला नसल्याचे म्हटले आहे. विश्वासात घेऊन कामकाज न करणे, काम करताना शासनाच्या नियमांचे पालन न करणे, मूलभूत सुविधांबाबत मागणी केल्यास टाळाटाळ करणे, नगरपंचायतीच्या वित्तीय आणि कार्यकारी प्रशासनावर लक्ष न ठेवणे, विविध योजनांचे प्रस्ताव राज्य व केंद्र सरकारकडे पाठविण्यास आणि मंजूर योजना राबविण्यासाठी दुर्लक्ष करणे आदी कारणांमुळे नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर विश्वास राहिला नसल्याचे पत्रात म्हटले आहे.
*’हे’ नगरसेवक गेले विरोधात
नगराध्यक्षांवर अविश्वास दाखवून विशेष बैठक बोलविण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. या पत्रावर रोहिणी सचिन घुले, छायाताई सुनील शेलार, संतोष सोपान म्हेत्रे, ज्योती लालासाहेब शेळके, सतीश उद्धवराव पाटील, लंकाबाई देविदास खरात, भास्कर बाबासाहेब भैलुमे, भाऊसाहेब सुधाकर तोरडमल, ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओकार तोटे, मोहिनी दत्तात्रय पिसाळ, अश्विनी गजानन दळवी, सुवर्णा रविंद्र सुपेकर यांच्या सह्या आहेत.