अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार !

इच्छुकांच्या माध्यमातून आत्तापासूनच मोर्चे बांधणी केली जात आहे. खरंतर भारतीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या अध्यायावत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यावरून विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू झाल्याचे दिसते. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची आणि चर्चेत असलेल्या इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेणार आहोत.

Tejas B Shelar
Updated:
Ahmedanagar Vidhansabha 2024

Ahmedanagar Vidhansabha 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलट फेर झाला आहे. त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यात दोन्ही जागांवर महायुतीचा सुपडा साफ झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेने आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाने जोरदार मुसंडी मारत विजयी गुलाल उधळला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उलटफेर होणार हे निवडणुकीआधीही वाटत होते. परंतु नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा पराभव ही महायुतीसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विरोध दूर सारून विखें यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला होता.

मात्र लोकसभेच्या निवडणुकीत विखे यांचा दारुण पराभव झाल्याने विखे कुटुंबियाच्या वर्चस्वावर या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असल्याने आता महायुती अगदी सावधगिरीने विधानसभेच्या मैदानात आपला फौजफाटा तैनात करणार आहे. विधानसभेचे मैदान गाजवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावरून देखील बंद दाराआड का होईना पण खलबत्त सुरू झाल आहे.

दोन्ही गटात इच्छुकांच्या माध्यमातून आत्तापासूनच मोर्चे बांधणी केली जात आहे. खरंतर भारतीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या अध्यायावत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यावरून विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू झाल्याचे दिसते. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची आणि चर्चेत असलेल्या इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेणार आहोत.

शेवगाव-पाथर्डी : विद्यमान आमदार मोनिकाताई रांजळे या गेल्या दोन निवडणुकांपासून या जागेवर विजयी होत आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष रांजळे यांना तिसऱ्यांदा या जागेवरून उमेदवारी देणार अशी शक्यता आहे. या जागेसाठी चंद्रशेखर घुले, प्रतापराव ढाकणे, हर्षदा ताई काकडे हे लोक या जागेसाठी इच्छुक आहेत. यामुळे महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून येथून कोणाला तिकीट मिळणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

राहुरी : भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांचा या जागेवरून गेल्या निवडणुकीत पराभव झाला. प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला होता. यंदा देखील याच दोघांमध्ये निवडणूक रंगणार असे भासत आहे. मात्र कर्डिले हे श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणुकीत उभे राहू शकतात असेही समीकरण पुढे येत आहे. असे झाले तर या जागेवरून महायुतीकडून दुसरा कोणता पर्याय पुढे येणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

नेवासा : शंकरराव गडाख यांच्या विरोधात महायुतीकडून कोण उभे राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. गडाख यांच्या विरोधात विठ्ठलराव लंघे आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे गडाख हे या निवडणुकीत गेल्या निवडणुकीप्रमाणे बॅट चिन्हावर निवडणूक लढवणार की शिवबंधन हाती असल्याने मशाल चिन्ह घेऊन निवडणुकीत उभे राहणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

नगर शहर : आमदार संग्राम जगताप गेल्यावेळी येथून निवडून आलेत आणि येत्या निवडणुकीत त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळू शकते. महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे किरण काळे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड अशी काही नावे या जागेसाठी चर्चेत आली आहेत.

कर्जत जामखेड : गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून सुजय विखे पाटील हे विजयी झालेत. त्यावेळी पालकमंत्री या नात्याने कर्जत जामखेड चे तत्कालीन आमदार रामभाऊ शिंदे यांनी मोठे कष्ट घेतलेत. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मधून राम शिंदे यांचा पराभव झाला. तेव्हापासून शिंदे विरुद्ध विखे असे गृहयुद्ध सुरू झाले. ते युद्ध लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही काळ थांबलेले पाहायला मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे युद्धविरामाच्या उल्लंघनाची आता दाट शक्यता व्यक्त होत आहे. पुन्हा विखे आणि शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे कर्जत जामखेडमधून महायुतीकडून राम शिंदे यांनाच उमेदवारी मिळू शकते असे म्हटले जात आहे. रामभाऊ यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारी जवळीक कोणापासून लपून राहिलेली नाही. यामुळे यावेळीही रामभाऊंनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास नक्की आहे. गेल्यावेळी रोहित पवार यांनी रामभाऊंचा पराभव केला होता. मात्र यावेळी रोहित पवार हे या जागेवरून निवडणूक लढवणार का याबाबत शँका आहे. कारण की ते पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार की अन्य कोणी उभे राहणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

श्रीगोंदा : भारतीय जनता पक्षाचे बबनराव पाचपुते हे येथून आमदार आहेत. मात्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे या निवडणुकीत या जागेवरून उभे राहणार अशा चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप, सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार अशा काही दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. यामुळे महायुतीकडून शिवाजीराव कर्डिले की पुन्हा पाचपुते आणि महाविकास आघाडीकडून कोण हे पाहणे विषय उत्सुकतेचे ठरणार आहे.

संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा विषय निघाला तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव आपसूक तोंडावर येते. महाविकास आघाडी कडून थोरात यांना कोणीच पर्याय नसल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान महायुती येथून कोणाला संधी देणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उभे राहणार आहेत यात शंकाच नाही. महाविकास आघाडीकडून येथून कोणाला तिकीट मिळेल हे पाहण्यासारखे राहील.

पारनेर : आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पराभव केला आहे. ते लोकसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने जायंट किलर म्हणून उदयास आले आहेत. यामुळे आता लंके जो चेहरा पुढे करणार त्यालाच पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणार असे दिसत आहे. यानुसार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना या जागेवरून विधानसभेचे तिकीट मिळू शकते. यामुळे महायुतीकडून या जागेवरून कोणाला संधी देते हे पाहण्यासारखे राहणार आहे. संदेश कार्ले यांच्या नावाची चर्चा आहे, पण उमेदवारांची नावे झाल्यानंतरच खरा चेहरा कोण असेल हे समजणार आहे.

अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे. या मतदारसंघाकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे नेहमीच लक्ष असते. सध्या येथे अजित दादा गटातील लहामटे हे आमदार आहेत. अजित दादा गटातील आमदार किरण लहामटे विरुद्ध वैभव पिचड अशी लढत होणार अशा चर्चा सध्या तरी आहेत.

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघात नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे आज एकाच गटात आहेत. गेल्या वेळी अर्थातच 2019 च्या निवडणुकीत आशुतोष काळे विरुद्ध बीजेपीच्या स्नेहलता कोल्हे यांच्यात लढत झाली होती. या लढतीत काळे यांना यश आले. निवडणुकीनंतर आशुतोष काळे यांनी अजितदादा यांच्या समवेत महायुतीत येण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यावेळी महायुतीकडून काळे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून येथून कोण उभे राहणार हे पाहण्यासारखे ठरेल.

श्रीरामपूर : गेल्यावेळी काँग्रेसचे लहू कानडे येथून निवडून आले आहेत. महाविकास आघाडी कडून यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळू शकते असे चित्र आहे. महायुतीकडून मात्र या जागेवर कोणाला तिकीट मिळणार याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नाहीये. यामुळे लहू कानडे विरुद्ध कोण हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe