Ahmednagar Cooperative Bank : अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. यामुळे आता बँकेवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. अनेक दिवसांपासून याठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते.

दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी मोठी शक्ती पणाला लावली होती. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी बँकेचे अध्यक्ष व युवा नेते अॅड. उदय शेळके यांना अध्यक्ष करण्यात आले होते. परंतु दुदैवाने प्रदीर्घ आजाराने उदय शेळके यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. यासाठी राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अध्यक्षपद मिळण्यासाठी तयारी केली होती.
बँकेच्या २१ संचालकांपैकी राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे चार, भाजपचे सहा व एक शिवसेना असे पक्षीय संचालक आहेत. यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद येईल, असे वाटत असताना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. तर भाजपाकडून शिवाजी कर्डिले यांचा उमेद्वारी अर्ज होता. यामुळे कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
घुले-कर्डिले यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीमध्ये कर्डिले यांना १० तर घुले यांना ९ मते मिळाली. तर १ मत बाद झाले. अध्यक्षपदासाठी बड्या नेत्यांनी फिल्डिंग लागल्याचे सांगितले जात आहे. याचा येणाऱ्या निवडणूकीत देखील परिणाम दिसण्याची शक्यता आहे.