Ahmednagar District New MIDC : राम शिंदेनी स्पष्टच सांगितलं एमआयडीसी दलालांच्या फायद्यासाठी नाही !

Published on -

कर्जतमध्ये होणारी एमआयडीसी जनतेच्या फायद्यासाठी होईल, दलालांच्या फायद्यासाठी नाही, आगामी आठ दिवसांत तालुक्यातील सहा जागांची पाहणी करून शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल, शेतकऱ्यांनी कोणालाही जागा विकू नयेत, असे आवाहन आ. प्रा. राम शिंदे यांनी केले.

तहसील कार्यालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.तालुक्यात एमआयडीसी करण्याचा प्रश्न अत्यंत प्रतिष्ठेचा बनला असून, यावरून जोरदार राजकारण सुरू असताना दि.१७ डिसेंबर रोजी नियोजित औद्योगिक वसाहत करण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात आ. शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक झाली.

बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी नियोजित जागेसाठीच्या निकषाबांबत माहिती देताना सांगितले की, औद्योगिक वसाहतीसाठीची जागा शक्यतो सपाट आणि समतल असावी, दळणवळणासाठी राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्ग हा लगत असावा, पडीक जमीन असावी, याठिकाणी पाण्याची व विजेची सोय असावी,

शक्यतो सलग क्षेत्र असावे. सदरची जमीन शासकीय किंवा खासगी जमीन असावी, संबंधित जमीनधारकास शासन रेडीरेकनर दराच्या ४ पट मोबदला दिला जातो तसेच संबंधित शेतजमीन मालकाला त्याच्या जमिनीच्या १० टक्के विकसित भूखंड निःशुल्क दराने व्यवसायासाठी दिला जातो, अशी माहिती दिली.

आ. शिंदे यांनी सांगितले की, पाटेगाव येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी तेथील जागेला असलेला शेतकऱ्यांचा विरोध, ईडीच्या कारवाईमुळे देशातून परागंदा झालेला निरव मोदी यांची असलेली वादग्रस्त जमीन, इको सेन्सिटीव्ह झोनसंदर्भातील काही प्रश्न, वनविभागाचे ना हरकत, प्रस्तावित जमिनीची सलगता नसणे व अन्य काही त्रुटीमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तेथील प्रस्ताव नाकारला आहे.

शासनाने तत्काळ औद्योगिक वसाहतीसाठी नवीन जागेचे प्रस्ताव मागितले आहेत. अधिकाऱ्यांनी सुचविलेले निकष पूर्ण करणारी जमीन सुचवा, असे आवाहन आ. शिंदे यांनी केले. लोकांनी सुचविलेल्या जागेचे सर्वेक्षण आठ दिवसांत पूर्ण करून घ्यावे.

जमीनमालकांनी जमिनी दलालांना विकू नये, बैठकीत कोंभळी, चिचोली रमजान परिसर, थेरगाव राष्ट्रीय महामार्गालगत, वालवड, सुपे परिसर, अळसुंदा, कोर्टी परिसर, शेती महामंडळाशेजारी, पठारवाडी व देऊळवाडी, दगडी बारडगाव हा परिसर, आदी सहा ठिकाणे सुचवण्यात आली.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, अशोक खेडकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके मेजर, डॉ. शबनम शेख, सुनिल यादव, बाजार समितीचे संचालक नंदकुमार नवले, काकासाहेब धांडे, युवक अध्यक्ष सोमनाथ शिंदे,

प्रकाश काका शिंदे, गणेश क्षीरसागर, गणेश पालवे, पप्पू धोदाड, अनिल गदादे, पप्पू धुमाळ, अॅड. रानमाळ राणे, राहुल निबोरे, बंटी यादव, स्वप्नील तोरडमल, उमेश जपे, बापूराव ढवळे, गणेश काळदाते, नंदलाल काळदाते, सुनील काळे, डॉ. सुरेश भिसे, डॉ. संदीप बरबडे आदी उपस्थित होते.

बैठकीचे नियोजन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केल. याप्रसंगी औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गवळी, तहसीलदार गणेश जगदाळे, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, कार्यकारी अभियंता कुकडी विभाग, वन्यजीव व प्रादेशिक वनविभाग अधिकारी, भूमी अभिलेख कर्जत आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe