Ahmednagar Jilha Sahkari Bank : सहकाराची पंढरी अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कारभारामुळे चर्चेत आहे. बँकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून यामुळे बँकेच्या संचालक मंडळात देखील अस्वस्थता पसरलेली आहे. जिल्हा बँकेत सध्या सुरू असणाऱ्या या गदारोळात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधील दरी वाढली आहे.
याचेच एक उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीला महाविकास आघाडीच्या संचालकांनी दांडी मारल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळाले. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या जिल्हा सहकारी बँकेची चौकशी सुरू आहे.
विभागीय सहनिबंधक यांच्या माध्यमातून ही चौकशी केली जात आहे. साखर कारखान्यांना बेकायदा वाटप करण्यात आलेले कर्ज, ठराविक एजन्सीलाच दिले जाणारे कंत्राट हे काही महत्त्वाचे मुद्दे आणि इतर पूरक मुद्दे लक्षात घेता जिल्हा सहकारी बँकेची चौकशी सुरू आहे.
दरम्यान आगामी काळात या चौकशीतून नेमके काय समोर येते ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे. यामुळे या चौकशीच्या अहवालाकडे साऱ्या नगर जिल्ह्याचे लक्ष आहे. दरम्यान आता जिल्हा सहकारी बँकेच्या कारभारावर सडकून टीका होऊ लागली आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रताप ढाकणे यांनी बँकेच्या कारभारावर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
मात्र या बैठकीला महाविकास आघाडीचे संचालक गैरहजर होते. यामुळे बँकेच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या संचालकांमध्ये दुरावा तयार झाल्या असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या बैठकीत बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, मोनिका रांजळे, अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, अनुराधा नागवडे, विवेक कोल्हे, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात इत्यादी महायुती मधील संचालक उपस्थित होते.
मात्र महाविकास आघाडीचा एकही संचालक या बैठकीला नव्हता. यामुळे या संचालक मंडळाच्या बैठकीची सध्या संपूर्ण नगरमध्ये चर्चा सुरू आहे. या सदर बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नाही परंतु बँकेचा लौकिक जपा असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
एकीकडे जिल्हा बँकेची चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे जिल्हा बँकेत होणाऱ्या नोकर भरतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. कारण की जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत आरक्षणच नाहीये.
याआधी जिल्हा बँकेत झालेल्या नोकर भरतीत आरक्षण देण्यात आलेले आहे मात्र बँकेने अलीकडेच काढलेल्या नोकर भरतीमध्ये आरक्षणाची तरतूदच नाहीये. यामुळे ही नोकर भरती देखील वादाच्या भोवऱ्यात अडकणार असे दिसते.