Ahmednagar-Manmad Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे झाली आहेत. गेल्या काही वर्षात देशात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र अहमदनगर-मनमाड महामार्गाची फारच बिकट अवस्था झाली आहे.
या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या महामार्गावर काही ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजतं नाही. यामुळे या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारणा करण्यात आली.
दरम्यान मंत्री विखे पाटील यांनी या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे या महामार्गाचे काम हे केंद्रीय रस्ते विकास विभागाकडे सोपवण्यात आलेले आहे.
महत्वाचे म्हणजे केंद्रीय रस्ते विकास विभागाकडून या मार्गाच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याचे काम सुरू असल्याची माहिती देखील मंत्री महोदयांनी यावेळी दिली आहे. यामुळे आगामी काळात अहमदनगर मनमाड महामार्गाची दुरावस्था दूर होईल आणि हा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
एवढेच नाही तर तात्पुरत्या स्वरूपात या महामार्गाची दुरुस्ती केली जावी यासाठी तब्बल 9 कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला असल्याची माहिती विखे पाटील यांनी यावेळी प्रसार माध्यमांची बोलताना दिली आहे.
खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार निलेश लंके यांनी हा निधी आपण आणले असल्याचे जाहीर केले होते. त्यावर विखे पाटील म्हणालेत की, या निधीचे कोण श्रेय घेतो, या वादात मला पडायचे नाही.
पण, हा निधी अगोदरच मंजूर झालेला आहे. पालकमंत्री विखे यांनी नुकत्याच दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला होता. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.