Ahmednagar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही गटांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अशातच, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार जवळपास फायनल झाला आहे. अजून या जागेवरील महायुतीच्या उमेदवाराचे नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जागा अजित पवार गटाला येईल आणि येथून त्यांच्याच गटाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे संकेत दिले आहेत.
काल, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जनसंवाद यात्रा ही अकोले येथे आली होती. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी थेट उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी, ‘गेल्या पाच वर्षातील तीनच वर्ष मला काम करायला मिळाले.
या तीन वर्षात तुमच्या बहाद्दर आमदाराने माझ्या मागे लागून अकोले तालुक्यासाठी भरघोस निधी घेतला आहे. जर आधीचे दोन वर्षे मिळाली असती तर अधिक काम करता आलं असतं. पण, तिजोरीचा भार पाहून मला कामे करावे लागतात.’,
असे सांगत विद्यमान आमदार किरण लहामटे यांचे कौतुक केले. तसेच पुढे बोलताना पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी धनुष्यबाण काही ठिकाणी घड्याळ आणि काही ठिकाणी कमळ हे चिन्ह राहणार आहे.
हे सर्व महायुतीचे चिन्ह आहेत. मात्र तुमच्या मतदारसंघात घड्याळ हे महायुतीचे चिन्ह राहणार आहे, असे म्हणत अजित पवारांनी येथून विद्यमान आमदार किरण लहामटे हे उमेदवारी करताना दिसतील असे संकेत दिले आहेत.
एवढेच नाही तर तुम्हाला महायुती सरकारने सुरू असलेल्या योजना जर चालू ठेवायच्या असतील तर घड्याळाला मतदान करावे लागेल असेही आवाहन केले आहे.
एकंदरीत महायुतीचे जागावाटप अजून फायनल झालेले नाही मात्र अजित पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून यावेळी किरण लहामटे हेच उमेदवार असतील असे स्पष्ट केले आहे.