Ahmednagar News : यंदाच्या अर्थसंकल्पात नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना निधी मिळाला. आ. जगताप आमदार असणाऱ्या नगर शहराला १३२ कोटी, आ. लहामटे यांच्या अकोलेस १८५ कोटींचा निधी तर कर्जत जामखेडला मिळून ७८ कोटींचा निधी मिळालाय.
परंतु राहुरी व नेवासे तालुक्यास शून्य रुपये निधी मिळाला. नेवासे तालुक्यासाठी सलग ३ वर्षांपासून सरकारने बजेटमध्ये एक रुपयाही निधी दिला नसल्याने मोठा असंतोष पसरला आहे. नेवासे तालुका काय पाकिस्तानात आहे का ? श्रेय तुम्ही घ्या. पण आम्हाला निधी द्या, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे यांनी केली.
नगर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत कोट्यवधीचा निधी आला आहे पण नेवासा तालुक्यात एक रुपयाही निधी दिला नाही. त्यामुळे सत्तांतर झाल्यानंतर नेवासा तालुक्यातील कामांना शासनाने राजकीय सूडबुद्धीने डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नेवासा तालुक्यातील आमदार विरोधी पक्षातील असले तरी निधी सार्वजनिक विकासाला वापरला जातो, एकडेही सरकारने लक्षात ठेवले नसल्याचे लोक बोलत आहेत. परिणामी सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी दिसून येत आहे.
विशेष म्हणजे शेजारच्या राहुरी तालुक्यातही विरोधी पक्षाचे आमदार असल्याने तेथेही शून्य निधी दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पावसाळी आधिवेशनातही नेवासे तालुक्यातून आमदार शंकरराव गडाख यांनी सुचवलेल्या रस्ते व इतर विविध विकासकामांवर सरकारने अवकृपा केली.
नेवासे तालुक्याच्या वाट्याला एक रुपयांचाही निधी सरकारने अधिवेशनात दिला नाही. नेवासे तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आमदार शंकरराव गडाख हे विरोधी पक्षात असल्यामुळे जणीवपूर्वक नेवासे तालुक्यातील कामे प्रलंबित ठेवले जात आहेत.
त्यामुळे या विरोधात नेवासे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेत शासनाविरोधात असंतोष आहे असे म्हटले जात आहे.
नेवासे तालुक्यावर अन्याय
सलग ३ बजेटमध्ये सरकारने नेवासे तालुक्यावर अन्याय केला असून दुसऱ्या तालुक्यात कोट्यवधींचा निधी मंजूर केला जात आहे. पण आमच्या तालुक्यावर सरकार अन्याय का करत आहे?
आमचा तालुका काय पाकिस्तानात आहे का ? श्रेय तुम्ही घ्या. पण आम्हाला निधी द्या, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे यांनी केली.
कोणत्या तालुक्यास किती निधी ?
कर्जत तालुक्याला ७५ कोटी रुपये, जामखेड ३ कोटी २० लाख, श्रीगोंदे १० कोटी ५० लाख, नगर तालुका १५ कोटी, अकोला १८५ कोटी, श्रीरामपूर १० कोटी ९० लाख, राहाता १८ कोटी ९९ लाख, शेवगाव ७ कोटी ५० लाख,
पारनेर १२ कोटी, संगमनेर ३९ कोटी ३० लाख, कोपरगाव १२ कोटी ७८ लाख, पाथर्डी २ कोटी ५० लाख, नगर शहर १३२ कोटी एवढा निधी मंजूर झाला. तर राहुरी ०० व नेवासा ०० अर्थात निधीच मिळाला नाही.